गांधीजींची शिकवण अंगिकारली पाहिजे- आ. शेखर निकम

भारावलेल्या वातावरणात बक्षिस वितरण सोहळा

चिपळूण (प्रतिनिधी) : महात्मा गांधीजींचा खेडी स्वावलंबी करण्याचा कार्यक्रम आपण आज प्रत्यक्ष कृतीत आणला पाहिजे तसेच त्यांची शिकवण अंगिकारली पाहिजे असे सांगून आ. शेखर निकम यांनी पूज्य गांधी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला. महात्मा गांधीच्या रक्षाकलश समाधीने पावन झालेल्या गांधारेश्वराच्या निसर्गरम्य परिसरात पूज्य गांधी प्रतिष्ठानतर्फे आयोजित गांधीजयंती कार्यक्रम गांधीप्रेमी व विद्यार्थी,शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत उत्तरोत्तर रंगत व छानदार पध्दतीने साजरा झाला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चार गटात घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठींच्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेला असा प्रतिसाद मिळाला त्याचे बक्षिस वितरण समारंभ गांधीजयंती दिनी मान्यवरांच्या हस्ते पार पडाले. यावेळी चिपळूणचे आ. शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, जयंद्रथ खताते व कोकणचे कलामहर्षी, सह्याद्री स्कूल आँफ आर्टस्चे संस्थापक प्रकाश शिर्के यांची उपस्थिती लाभली तर वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्राँडक्टस् चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव व नगराध्यक्ष उमेश सकपाळ हे निमंञित उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा पाठविल्या. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील चारही गटात आलेल्या सर्वश्री. कु. वेदांत महेंद्र महाडीक, कु. इच्छा सिताराम कदम, कु.मनवा प्रशांत सातारकर व कु. वेदिका विष्णू हरवडे या विद्यार्थ्यांची गांधीजींचे जीवनकार्य स्पष्ट करणारी सुरेख भाषणे झाली.
जिल्हास्तरीय घेतलेल्या या स्पर्धेत २८ स्कूल, कॉलेजेसनी भाग घेतला, त्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामध्ये चिपळूणमधील अली पब्लिक स्कूलचा मोठा सहभाग होता. कार्यक्रमाची सुरेल सुरवात चिपळूणच्या प्रसिद्ध गायिका उत्तरा साडविलकर यांनी गायलेल्या ‘ईश्वर अल्ला तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान’ या गांधीजींच्या भजनाने व साने गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेने झाली. त्यानंतर आपल्या प्रास्ताविकातून मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस यांनी गेली पाच वर्षे सतत गांधीजयंती निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धे बाबत माहिती देत याला मिळणारा वाढता प्रतिसाद बाबत समाधान व्यक्त केले. यावेळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून उत्तम काम केल्याबद्दल महमंद हुसेन मूसा,शरयू इंदूलकर,मानसी टाकले व मृणाल पवार यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले तसेच कलाशिक्षक अरुण शिगवण व सीमा संजय कदम आदींचाही सहकार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार रमेश कदम यांनी प्रतिष्ठान घेत असलेले चांगल्या कार्यक्रम, उपक्रम बाबत उल्लेख करतानाच चिपळूण नगरपरिषदेने यासाठी सहकार्य केले पाहिजे. प्रकाश राजेशिर्के यांनी “खेड्याकडे चला” हा गांधीजींचा संदेश आपण ऐकला व मुंबईतील करिअर सोडून गावी परतलो असे सांगितले तसेच त्यांनी गांधीजींच्या सत्याचा प्रयोगचा उल्लेख केला. आजचे विद्यार्थ्यांचे भाषणे ऐकून आपण भारावून गेलो असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा मोठा प्रतिसाद मिळाला. शांत वाहाणाऱ्या वाशिष्ठी नदी काठावरील हा सुंदर,शांत परिसर विद्यार्थी, गांधीप्रेमी फूलून गेला होता. कार्यक्रम यशस्वीसाठी प्रतिष्ठानचे मंगेश वेस्वीकर,लियाकत शहा, दिपक महाडिक, जाफर गोठे तसेच सौ. सुनिता महाडीक, सौ. अमृता होमकळस, सौ.छाया सातारकर आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन सौ. सई वरवाटकर यांनी तर आभार व प्रमाणपत्र वाचन सचिव सुनिल खेडेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्व उपस्थितांनी प्रतिष्ठानचे आभार मानले.