सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई!

चोरी, घरफोडी व संघटित गुन्हेगारीतील फरार आरोपी तुळजापुरातून जेरबंद.

खून प्रयत्न, वाहन चोरीसह गोव्यातील तीन गुन्ह्यांतही संशयित आरोपीचा सहभाग

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सावंतवाडीतील चोरी, घरफोडी आणि संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या राहुल सुनील भोसले (वय २७, रा. धनेगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याला सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तुळजापूर परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. गेल्या काही काळापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीचा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे माग काढला. विशेष म्हणजे, गोव्यातील खुनाचा प्रयत्न, वाहन चोरी आणि घरफोडी अशा तीन गुन्ह्यांतही तो पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सावंतवाडी पोलीस ठाण्यात १० जुलै २०२५ रोजी गुन्हा क्रमांक १२९/२०२५ नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संघटित गुन्हेगारीसंदर्भात भारतीय न्याय संहितेच्या कलम १११ चा समावेश करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी राहुल भोसले हा गुन्हा घडल्यापासून स्वतःचे अस्तित्व लपवून फिरत असल्याने पोलिसांना सापडत नव्हता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले आणि त्यांच्या पथकाने आरोपीचा सातत्याने शोध सुरू ठेवला होता. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी आपल्या मूळ गावाच्या, म्हणजेच धनेगाव आणि तुळजापूर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने या परिसरात जाऊन त्याच्या हालचालींवर पाळत ठेवली. अखेर ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता धनेगाव परिसरातून पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे सावंतवाडीतील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

गोव्यातील तीन गुन्ह्यांतही पाहिजे आरोपी
राहुल भोसले याच्याविरुद्ध गोव्यातील पेडणे आणि ओल्ड गोवा पोलीस ठाण्यांत तीन गुन्हे दाखल असून, त्यामध्येही तो पाहिजे आरोपी आहे. पेडणे पोलीस ठाण्यातील दोन प्रकरणांपैकी एका गुन्ह्यात खुनाच्या प्रयत्नाचे, तर दुसऱ्या गुन्ह्यात वाहन चोरीचे आरोप आहेत. ओल्ड गोवा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांच्या या कारवाईतून गोव्यातील गुन्ह्यांच्या तपासासाठीही महत्त्वाचा दुवा उपलब्ध झाला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, हेड कॉन्स्टेबल ओटववणेकर, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर आणि समजिस्कर यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.