जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे ही उतरल्या ग्रामस्थ व अधिकाऱ्यांसमवेत श्रमदानात
वेंगुर्ले : दाजी नाईक
भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून भव्य तीन वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. सुमारे ७५ फूट लांबीच्या एका बंधाऱ्यासाठी एक हजार पोत्यांचा वापर करण्यात आला असून, सुमारे २५० ग्रामस्थांनी श्रमदानातून या जलसंधारणाच्या कामात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच यावेळी गाव सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी ग्रामदैवताला गाऱ्हाणे घालण्यात आले.
यावेळी उप विभागीय अधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार ओंकार ओतारी, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, सदस्य शीतल राऊत, नितीन मांजरेकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, कृषी अधिकारी मंगेश चव्हाण,वसंत मोहिते, सरपंच उदय गोवेकर, संतोष पिंगूळकर, ग्राम महसूल अधिकारी चारुशीला वेतुरकर, कमलेश गावडे, श्रीकृण बांदवलकर, सुभाष खानोलकर, गणेश आरावंदेकर, संजय नागडे, सहाय्यक कृषी अधिकारी, दाभोली इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, पोलीस पाटील, तालुका उमेद अभियान केडर, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील महिला बचत गट, शेतकरी, बागायतदार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, संगम ग्राम संघ दाभोली, भरारी महिला प्रभाग संघ यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिक श्रमदानासाठी पुढे येत आहेत, ही बाब अत्यंत आशादायी :
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी ग्रामस्थ, महिला बचत गट, शालेय विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिक स्वतःहून श्रमदानासाठी पुढे येत आहेत, ही बाब अत्यंत आशादायी असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता लोकांनी स्वतःच्या श्रमातून जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. मागील आठ ते दहा दिवसांत जिल्ह्यात लोकसहभागातून चार हजार हून अधिक बंधारे उभारण्यात आले असून, ही चळवळ प्रशासन आणि जनतेतील समन्वयाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
दाभोली तील बंधाऱ्यामुळे पाच किलोमीटर क्षेत्रातील पाणी टिकून राहण्यास मदत होणार
दाभोली येथील वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी सदस्यांनी समन्वयाने तांत्रिक नियोजन केले. या बंधाऱ्यांमुळे परिसरातील सुमारे चार ते पाच किलोमीटर क्षेत्रातील पाणी टिकून राहण्यास मदत होणार असून, आजूबाजूच्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यासही हातभार लागणार आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचे जमिनीत जिरवण करणे आणि भूजलपातळी वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
या नदीवर कायमस्वरूपी पक्क्या बंधाऱ्याची मागणी
दाभोली गावाची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन वनराई बंधारा उभारलेल्या ठिकाणी कायमस्वरूपी पक्क्या बंधाऱ्याची मागणीही ग्रामस्थांनी यावेळी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गावातील जलतारा कामाचे उद्घाटन करण्यात आले.













