डॉ. अमेय गोडबोलेंना ‘लिडर्स ऑफ चेंज’ पुरस्कार

खासगी कोचिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल चिपळुणातील गोडबोलेज् क्लासेसचा गौरव

चिपळूण (वार्ताहर) : शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला दिशा देणारे चिपळुणातील सुप्रसिद्ध गोडबोलेज क्लासेसचे संचालक डॉ. अमेय गोडबोले यांना लिडर्स ऑफ चेंज इन प्रायव्हेट कोचिंग क्लासेस या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले. खासगी कोचिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत शिक्षणपद्धतीत व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. अमेय गोडबोले यांनी भर गोडबोलेज क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर दिला आहे. बदलत्या शैक्षणिक पद्धती स्पर्धात्मक परीक्षांचे वाढते आव्हान लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञान, नियोजनबद्ध अध्यापन व विद्यार्थकिंद्री शिक्षणपद्धतीचा प्रभावी वापर केला आहे. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवून देणे एवढ्यापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह आत्मविश्वास, शिस्त, सातत्य आणि स्पर्धात्मक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी गोडबोलेज् क्लासेसकडून विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे चिपळूणसह परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये या शैक्षणिक संस्थेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा पुरस्कार म्हणजे गोडबोलेज् क्लासेसच्या शैक्षणिक कार्याची आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाची दखल असल्याचे मानले जात आहे. या सन्मानामुळे चिपळूणच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.