वजराटच्या गुलाबी कासले या महिलेने एकटीने बांधला कच्चा बंधारा

सर्वांसमोर आदर्श : ग्रामपंचायतीतर्फे विशेष आभार : सर्वांनी पाणी वाचवण्याचे आवाहन

वेंगुर्ले : दाजी नाईक
भविष्यातील पाणी टंचाई या संकटाची चाहूल ओळखून वेंगुर्ले तालुक्यातील वजराट पिंपळगाव येथील श्रीमती गुलाबी गुरुनाथ कासले या एकट्या महिलेने एक अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. ज्या ठिकाणी पाणी वाहून वाया जात होते, तिथे स्वतःच्या कष्टाने आणि भविष्याचा दूरदृष्टीने विचार करून श्रमदान करत कच्चा बंधारा उभारला आहे.
त्यांच्या या अफाट जिद्दीमुळे आणि परिश्रमामुळे वाहून जाणारे पाणी अडवण्यात यश आले असून, त्यांनी संपूर्ण गावाबरोबर तालुक्यासमोर पाणी अडवण्याचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. गुलाबी कासले यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वजराट ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले. “गुलाबी गुरुनाथ कासले यांनी दाखवलेली सामाजिक जाणीव आणि पाण्यासाठी केलेले श्रमदान खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. आगामी पाणीटंचाई लक्षात घेता, प्रत्येकाने गुलाबी ताईंचा आदर्श घेऊन आपापल्या परिसरात छोटे-मोठे कच्चे बंधारे घालावेत आणि पाणी अडवून ते जिरवावे,” असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे. चला, आपणही यातून बोध घेऊया आणि पाणी वाचवण्यासाठी आजच पुढाकार घेऊया अशी एकच चर्चा गावात सुरू आहे. सध्या अल निनो च्या प्रभावामुळे आगामी काळात तीव्र दुष्काळ आणि पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा कठीण परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब अन थेंब वाचवणे काळाची गरज बनली आहे.