संतोष वायंगणकर
समाजातील काही व्यक्ती या एखाद्या क्षेत्रात काम करताना त्या क्षेत्राशी अत्यंत प्रामाणिक, निष्ठेने आणि तितकीच स्वत:ची काळजी न घेता काळजी न करता काम करत रहातात. वेड लागल्यासारख त्यांच काम सुरू रहात. सुहास वरूणकर या नाट्यकर्मिच तसच होत. रंगभूमीचा एक प्रामाणिक शिलेदार असलेला सुहासच रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्याने जाणं सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वांच्याच जिव्हारी लागणार होतं.
सुहास हा कणकवली कॉलेजचा विद्यार्थी त्यामुळे कॉलेजमध्ये एक-दोन वर्षे सिनिअर असलेल्या सुहासला कॉलेजमध्ये पाहिलं आहे. विशेषकरून सुहास आठवतोय तो कॉलेजच्या स्नेहसंमेलनात रंगमंच गाजवताना त्याला पाहिलाय. अशाच एका गॅदरींगमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना अंडी, टॉमेटो फेकले जात होते. कारण कार्यक्रम आवडी-निवडीचा नव्हता आणि नसतो. कॉलेज निवडणुकीत पराभूत झालेल्या पॅनलमधील काहींना राग व्यक्त करण्याची ती एक संधी समजून काहीजण हा उद्योग करतात इतकेच. तर अशाच एका कार्यक्रमात प्रेक्षागृहातून टॉमेटो, अंडी फेखली जात असताना छत्रीच्या काळ्या कापडाची चड्डी घालून मालवणीतून चार शिव्या हासडत सुहासची एन्ट्री झाली आणि सारेच चिडीचूप अंडी-टॉमेटो गायब सार प्रेक्षागृह हास्यकल्लोळात डुबून गेलं होतं. जेव्हा सुहासचा परफॉर्मन्स संपला आणि सुहास विंगेत जायला निघाला. तेव्हा वन्समोअरची प्रेक्षकांकडून मागणी न होती तर नवल. अशी ही सुहासची रंगमंचावरची पहिली भेट झालेली. नंतरच्या काळात एकांकीका स्पर्धा, एस.टी. महामंडळाच्या नाट्य स्पर्धा यामध्ये सुहास सतत काम करत राहीला. नाटकवेडा असलेला सुहास या-ना त्या कारणाने सांस्कृतिक चळवळीशी कायम जोडला गेला. कोकणातील अनेक एकांकीका स्पर्धेत सुहास वरूणकर, अभय खडपकर, विजय चव्हाण हे हमखास असायचेच. अक्षरसिंधुच्या माध्यमातून कोकणाला आणि महाराष्ट्राला मराठी प्रायोगिक रंगभूमीला अनेक नाट्यकृती सुहासच्या दर्जेदार दिग्दर्शनाने दिल्या आहेत. सुहासच सगळ्यांशी बोलणं, वागणं फार मोकळ ढाकळच होतं. मालवणीतून एखाद्या आपलेपणाच्या इरसाल शिवीनेच सुहास हाक मारायचा. सुहासच्या बोलण्यात रागावण नसायच. त्यात आपलेपणा आणि आपला माणूस हीच भावना असायची. यामुळेच सुहासचे कणकवली कॉलेजमधील समकालीन वारंवार न भेटताही त्यांच्यातील जिव्हाळा फार कमीवेळा भेटूनही कायम राहीला. देहयष्टीने सुहास फार मोठा वाटत असला तरीही सुहासच राहणीमान आणि त्याच बोलणं मात्र कुणालाही आपलस करायचे. कणकवलीच्या सांस्कृतिक चळवळीत सुहासच फारमोठ योगदान होतं. कणकवलीत कोणताही सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होत असेल तर सुहासच दिग्दर्शन आणि मार्गदर्शन ठरलेलच असायच. शंभर-दोनशे तरूण कलावंतांना एकत्र आणत सुहास असा काय एखादी कलाकृती सादर करायचा की, पहाणाऱ्या प्रेक्षकांचे डोळे दिपले पाहिजेत. इतका जीव ओतून त्याच दिग्दर्शन असायच. कणकवलीतील असंख्य तरूण कलावंतांचा सुहास हा गुरू आहे. रंगमंचावर एखादी कलाकृती सादर करत असताना त्यात कलावंताने जीव ओतून काम केलं पाहिजे हा सुहासचा आग्रह होता. सुहास आणि प्रा.हरिभाऊ भिसे यांची बतावणी म्हणजे प्रेक्षकांना एकप्रकारची पर्वणीच असायची. एस.टी. महामंडळातील नोकरी सांभाळत सुहास त्याच रंगभूमीवरच नाटकवेड त्यानं जपलं होतं. यामुळेच एस.टी. महामंडळाच्या नाट्य स्पर्धेत सुहास वरूणकर, दिपक परब, अभिनेते नंदू पाटील, श्याम नाडकर्णी, अभय खडपकर या सर्वांमुळे नेहमीच स्पर्धेत विजेता रहाण्याचा मान मिळत गेला. कणकवली पर्यटन महोत्सवातील स्थानिक कलावंतांना घेऊन सुहास असा भारदस्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करायचा ते पाहून क्षणभर वाटायच कशाला पुणे, मुंबईच्या कलावंतांना बोलवायच हे वाटायच. रविवारी सायंकाळी सुहासच्या जाण्याचे वृत्त समजले आणि मन अस्वस्थ झाले. केवळ कणकवलीच्याच नव्हेतर कोकणच्या सांस्कृतिक चळवळीत सतत नव काही करण्याचा प्रयत्न करणारा प्रामाणिक रंगकर्मी कॉलेजफ्रेंड कायमचा निघून गेला. सुहासची एक्झिट त्याच जाणं अस्वस्थ करणार वेदनादायीच आहे. सुहासला भावपूर्ण श्रद्धांजली.












