सद्यस्थितीत जलसंवर्धन ही काळाची गरज : सभापती शंकर घारे

शिरोडा येथे जलमहोत्सव उत्साहात साजरा

वेंगुर्ले : प्रतिनिधी
पाण्याचे महत्त्व अधोरेखित करत सभापती शंकर घारे यांनी जलसंवर्धनासाठी प्रत्येकाने जबाबदारीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. पाणी हे मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असून भविष्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी आजपासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. पावसाचे पाणी अडवणे, त्याचा योग्य विनियोग करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. शासनाच्या पाणीपुरवठा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिरोडा येथील जल महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलले होते.

शिरोडा येथे जलमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याच्या टाकीच्या उभारणीसाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून देणारे श्री. मोहन गावडे यांच्या वतीने उपस्थित असलेले दिलीप गावडे आणि सिद्धेश गावडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गावाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल गावडे कुटुंबाच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाला आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सभापती शंकर घारे, पंचायत समिती सदस्य प्रियांका घाटवळ, सरपंच लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी, पाणीपुरवठा विभागाचे प्रफुल्ल शिंदे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी निगुडकर भाऊ आणि पंचायत समितीच्या अक्षता नाईक मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाणी जपणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण : प्रितेश राऊळ
आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी आपल्या भाषणात स्वच्छ पाणी, आरोग्य आणि लोकसहभाग यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यास ग्रामस्थांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होते.

जलजीवन मिशनसारख्या योजनांमुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यास हातभार लागतो. मात्र, केवळ पाणीपुरवठ्याची सुविधा निर्माण करून चालणार नाही, तर पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवणे आणि जलसंवर्धनाच्या उपक्रमांत ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने जलसंवर्धनाचा संदेश आपल्या कुटुंबापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर, पांडुरंग नाईक, रश्मी डिचोलकर, हेतल गावडे, अर्चना नाईक, अनिस्का गोडकर, अनन्या घाटवळ, माजी सरपंच विजय पडवळ, मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, माजी सदस्य दिलीप गावडे आणि प्राची नाईक उपस्थित होते.

तसेच स्थानिक ग्रामस्थ, आरोग्य अधिकारी, बचत गटातील महिला, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशांत चव्हाण यांनी मानले.