बहादूरशेख-कळंबस्ते पुलावर पथदिवे लावण्याची शौकत मुकादम यांची मागणी
चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील बहादूरशेख-कळंबस्ते येथील नवीन वाशिष्ठी पुलावर पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पुलावर तसेच नदीत कचरा टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये मासे आणि चिकनचा खराब मालही टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. हा प्रकार माजी सभापती शौकत मुकादम यांनी उजेडात आणला असून, पुलावर तातडीने पथदिवे बसविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेख-कळंबस्ते येथे नवीन वाशिष्ठी पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, या पुलावर अद्याप पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. संबंधित ठेकेदार कंपनीच्या अंदाजपत्रकात पथदिव्यांची तरतूद असतानाही प्रत्यक्षात त्यांची उभारणी करण्यात आलेली नसल्याचा आरोप शौकतभाई मुकादम यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पुलावर रात्रीच्या वेळी अंधार असल्याने काहीजण याचा गैरफायदा घेत पुलावर आणि नदीत कचरा टाकत आहेत. विशेषतः मासे व चिकनचा खराब माल टाकला जात असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या परिसरात अशा प्रकारे कचरा टाकणे पर्यावरणाच्या दृष्टीनेही चिंताजनक आहे.
पथदिवे नसल्यामुळे या प्रकारांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याचे मुकादम यांनी निदर्शनास आणून दिले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदार कंपनीने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन बहादूरशेख-कळंबस्ते पुलावर पथदिवे बसविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे. पुलावरील पथदिव्यांचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता संबंधित यंत्रणा या मागणीची कितपत दखल घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.













