विजयदुर्ग भागातील रामेश्वर- काठे येथे असलेल्या शिवकालीन विहिरी म्हणजेच कातळात कोरलेल्या बारव इतिहास संशोधक संतोष ओक यांचा दावा


विजयदुर्ग (बाळा कदम) : विजयदुर्ग येथील रामेश्वर- काठे रस्त्यालगत असलेल्या विहिरींचे खोदकाम म्हणजेच शिवकालीन कातळात कोरलेल्या बारव ( विहिरीचा एक प्रकार ) असल्याचे गुहागर येथील इतिहास अभ्यासक संतोष ओक यांनी सांगितलं. ते नुकतेच ऐतिहासिक पर्यटनासाठी विजयदुर्गला आले होते. विजयदुर्ग येथील इतिहासप्रेमी यशपाल जैतापकर हे संतोष ओक यांच्या समवेत विजयदुर्ग भागातील काही तत्कालीन वास्तू, तत्सम बांधकामे निरीक्षण करत असताना काठे येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीच्या अभ्यासाअंती त्यांनी ही माहिती दिली. या वास्तू येथील ग्रामस्थ पर्यटकांनीही पाहिल्या. पण त्या नक्की कशासाठी बांधल्या असाव्यात आणि त्याचा उद्देश काय याबाबत सर्वसामान्य अनभिज्ञ होते. विजयदुर्ग किल्ल्याकडे जाताना विजयदुर्गच्या मागे ५ किलोमीटर अंतरावर रामेश्वर काठे हे गाव लागतं. दरम्यान, डाव्या बाजूला रस्त्याच्या लगतच या बारव दिसतात. या बारव म्हणजे कोकणातलं आश्चर्यच म्हणता येईल. फोटोमध्ये दिसणारी ही सामान्य विहीर नाही, तर इतिहासाची साक्ष देणारी बारव आहे.
पाऊस कमी असला तरी आपल्या पूर्वजांनी पाण्यासाठी केलेली ही कमाल आहे. कोणतंही सिमेंट, मशिन नाही फक्त छन्नी-हातोड्याने अखंड जांभ्या कातळात ३० ते ४० फूट खोल खोदून ही बारव तयार केली आहे. दोन्ही बाजूचे कातळ हीच तिची भिंत आहे आणि मध्ये पायऱ्या!
*इतिहास काय सांगतो?*
ही शिवकालीन बारव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ले आणि गाववस्त्यांसाठी पाणी साठवण्यासाठी अशा बारवा बांधल्या गेल्या. पाणी साठवण्यासाठी आणि शेतीसाठी याचा उपयोग होत असे. आज आपण बोअरवेल मारतो, पण ३५० वर्षांपूर्वी पाणी अडवून, जिरवून ठेवण्याचं हे तंत्रज्ञान खरंच थक्क करणारं आहे. देवगडचा हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे असं म्हणता येईल.
दरम्यान, ऐतिहासिक काळात चोरी किंवा वन्य प्राण्यांपासून धोका निर्माण झाल्यास या विशिष्ट बारवमध्ये माणूस राहू शकतो. त्याला पाणी मिळू शकतं अशी रचना आहे. सद्यस्थितीत दुष्काळाचे महाभयंकर सावट संपूर्ण महाराष्ट्रावर निर्माण झाले आहे. पाण्याचा एक एक थेंब वाचविण्याचे आवाहन राज्य सरकार याचबरोबर असंख्य सामाजिक संस्था करताना दिसतात. या दृष्टीने भविष्यात या बारव संदर्भात काही अभ्यास करून पाणीसाठा नव्या तंत्रज्ञानाने जतन करता येईल का याचा विचार व्हावा अशी अपेक्षा आहे.