राहत्या खोलीत गळफास घेत जीवन संपविले!
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पोफळी मार्केट परिसरातील मानकर चाळ येथे भाड्याने राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उदय नरसिंग निंबाळकर (वय २३, मूळ रा. उदगीर, जि. लातूर) हा कामानिमित्त चिपळूण तालुक्यातील पोफळी मार्केट येथील मानकर यांच्या चाळीत भाड्याने राहत होता. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान त्याने राहत्या खोलीतील छताच्या लाकडी वाशाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. दुपारच्या सुमारास ही घटना निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक कार्यवाही केली. दरम्यान, तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.












