खोटी माहिती देणाऱ्यावर काय कारवाई होणार? नागरिकांचा प्रश्न
संतोष कोत्रे
लांजा : आंजणारी पूल येथे अपघात झालेला नसतानाही लांजा पोलिसांना ११२ वर कॉल करून अपघात झाल्याची फेक माहिती देऊन तिघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या संबंधितावर लांजा पोलीस कधी आणि काय कारवाई करणार? याकडे आता लांजावासीयांचे लक्ष लागले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्र ठरलेल्या आंजणारी घाटामध्ये शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये कंटेनरने दिलेल्या धडकेमध्ये
हातखंबा वाहतूक शाखेची व्हॅन दोनशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे हे देखील जबर जखमी झाले होते. तर या अपघातामध्ये लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालक मदन हेम सिंह आणि क्लीनर या दोघांचाही मृत्यू झाला होता.
मात्र या घटनेनंतर अनेक प्रश्न प्रकर्षाने पुढे आले आहेत. मुळातच आंजणारी पूल येथे कोणताही अपघात झालेला नसतानाही लांजा पोलिसांच्या ११२ वर कॉल करून अपघात झाला आहे अशी खोटी आणि चुकीची माहिती देणारी व्यक्ती कोण? त्या मागे त्या व्यक्तीचा नेमका उद्देश काय? याबरोबरच पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर लांजा पोलीस कारवाई करणार का? किंवा कधी करणार? असा प्रश्न लांजा वासीयांतून उपस्थित केला जात आहे.
तसेच या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग येऊन अपघात रोखण्याबाबत कायमस्वरूपी ठोस उपाययोजना केली जाणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.












