• अतिक्रमण काढण्याचे निर्देश ; ३० दिवसांची मुदत
*सावंतवाडी :* शहरातील ‘रमेश्वर प्लाझा’ इमारतीमधील मंजूर बांधकामाच्या मर्यादेबाहेर जाऊन समोरील पॅसेजमध्ये अनधिकृतपणे दुकानाचा विस्तार काही जणांनी केला आहे. यात काही मोठ्या हस्तींचा देखील समावेश असून हे अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध सावंतवाडी नगरपरिषदेने कठोर पावले उचलली आहेत. याप्रकरणी संबंधितांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५२ व ५३ अन्वये अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे. एक महिन्याच्या आत हे अतिक्रमण काढून पॅसेज मोकळा करण्याचा इशारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी दिला आहे.
‘रामेश्वर प्लाझा’ इमारतीस नगरपरिषदेने दिलेल्या बांधकाम परवानगी आणि मंजूर नकाशानुसार इमारतीसमोरील पॅसेज हा सार्वजनिक व सामायिक वापरासाठी मोकळा ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, नगरपरिषदेने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत आणि उपलब्ध नोंदींच्या तपासणीत मंजूर आराखड्याचे उल्लंघन करून पॅसेजच्या जागेत अतिक्रमण करत दुकानाचा विस्तार केल्याचे निदर्शनास आले आहे. हे अतिरिक्त बांधकाम मंजूर नकाशानुसार नसल्याने ते कलम ५२ नुसार ‘अनधिकृत विकास’ ठरवण्यात आले आहे. कलम ५३ अन्वये बजावलेल्या नोटिसीनुसार, नोटीस मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत हे अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून पॅसेज पूर्वस्थितीत आणि मोकळा करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत संबंधित दुकानदारांनी अतिक्रमण न हटवल्यास नगरपरिषदेमार्फत कायदेशीर तरतुदींनुसार प्रत्यक्ष पाडकामाची व कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.













