

शाळेच्या किचन शेडमध्ये घुसलेल्या पाच फूट लांबीच्या नागाला सर्पमित्रांनी पकडले
संतोष कोत्रे l लांजा : विद्यार्थ्यांचे दैव बलवत्तर म्हणून शाळेच्या किचन शेडमध्ये घुसलेला तो अस्सल विषारी नाग जातीचा साप दृष्टीस पडला आणि सर्पमित्रांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. तालुक्यातील जावडे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये हा प्रकार घडला.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जावडे नंबर १ च्या किचन शेडमध्ये हा नाग जातीचा अस्सल विषारी साप घुसला होता. पूर्ण वाढ झालेला आणि पाच फूट लांबीचा असा हा नाग होता. या शाळेतील शिक्षकांना हा साप दृष्टीस पडला. त्यानंतर शाळेचे शिक्षक रामचंद्र मापनकर यांनी तात्काळ लांजा येथील सर्पमित्र सचिन जाधव यांना फोन करून याबाबची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र सचिन जाधव आणि विठ्ठल गोगुलवार हे शाळेत दाखल झाले. त्यानंतर या विषारी नाग जातीच्या सापाला पकडण्यात आले. यासाठी शाळेचे शिक्षक रामदास कदम, सौ. मांडवकर यांचे देखील सहकार्य लाभले.
दरम्यान नाग जातीचा अस्सल विषारी साप हा वेळीच शिक्षकांच्या दृष्टीस पडला नाही तर मोठ्या गंभीर प्रकाराला सामोरे जावे लागले असते .मात्र विद्यार्थ्यांच्या सुदैवाने तो साप शिक्षकांच्या नजरेत आला आणि पुढील प्रकार टळला. मात्र या अस्सल नाग जातीच्या सापाला पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांची चांगलीच बोबडी वळली होती. पालक देखील घाबरून गेले होते .मात्र हा साप पकडल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.












