दापोली गारठली: दापोलीत 10 अंश तापमानाची नोंद

दापोली | प्रतिनिधी : कोकण पट्टय़ातही सिमल्यासारखी बोचणारी थंडी जाणवू लागली आहे. कोकणात थंडीचा कडाका वाढत असून बुधवारी कोकणातील दापोलीत सर्वाधिक 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने ही नोंद केली. थंडीची ही या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद आहे.

राज्यात साधारणपणे ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबरच्या प्रारंभास जिह्यात थंडीला प्रारंभ होतो. यंदा नोव्हेंबरमध्ये एक-दोन दिवसच थंडीची चाहूल लागली, मात्र त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली. नोव्हेंबरच्या अखेरीस पुन्हा दोन-चार दिवस थंडी पडली; परंतु मंदौस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरण होऊन थंडी कमी झाली. त्यानंतर थंडीत सतत चढउतार होत होते. मात्र उत्तर भारतात सुरू असलेली बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमानात घट झाली आहे. गेले सलग एक आठवडा तापमानात कमालीची घट कायम आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वाधिक कमी तापमान जळगाव येथे 5.3 अंश सेल्सिअस तर पुण्यात 7.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.