खेड (प्रतिनिधी) एजंटद्वारे परदेशी व्हिजाची माहिती घेऊन कोकणातील तरुणांना परदेशी नोकरीला पाठवतो, असे आमिष दाखवत २ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक करत परदेशात पसार झालेल्या ठकसेन मोहम्मद सलीम शगुल हमीद (६१, रा. कोचिपलयाम -तामिळनाडू) याच्या तिरुचिरापल्ली – तामिळनाडू विमानतळावरून मुसक्या आवळल्या. त्याचा व्हिजाही येथील पोलिसांनी जप्त केला आहे.
जानेवारी २०१७ मध्ये ओळख झाल्यानंतर तालुक्यातील पटवर्धन लोटे येथे चप्पल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या असिफ महामूद सनगे (रा. घाणेखुंट-गवळवाडी) यांना वेळोवेळी एजंटद्वारे परदेशी व्हिजाची माहिती घेतो व कोकणातील तरुणांना परदेशात नोकरीला लावतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी माझ्या खात्यात पैसे भरत जा, व्हिजासाठी ९ ते १० वर्षे लागतील, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अनेकवेळा विविध बँकांच्या खात्यांमध्ये २ लाख १४ हजार रुपयांची रक्कम जमा केली.
अनेक वर्षे लोटूनही व्हिजाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्याकडे लक्ष न देता टाळण्यास सुरुवात केली. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच असिफ सनगे यांनी पोलीस स्थानक गाठत २७ एप्रिल २०१९ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तामिळनाडू येथे शोध घेण्यात आला असता मोहम्मद हमीद हा परदेशात पसार झाला होता.
११ फेब्रुवारी २०२१ मध्ये येथील न्यायालयात सीआरपीसी २९९ प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. फसवणूक प्रकरणातील संशयित मोहम्मद हमीद हा तिरूचिरापल्ली- तामिळनाडू विमानतळावर आल्यानंतर इमिग्रेशन अधिकारी, इमिग्रेशन ब्युरो डी. पवनकुमार यांनी ताब्यात घेत तामिळनाडू पोलीस स्थानकाच्या स्वाधीन केले. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी मोहम्मद हमीद यास ताब्यात घेतले. त्याचा व्हिजाही जप्त करण्यात आला आहे.










