गांडूळखताच्या मार्केटिंग साठी विशेष प्रशिक्षण देणार-सीईओ किर्ती किरण पुजार
गुहागर | प्रतिनिधी : रासायनिक खतांच्या वापर कमी करण्यासाठी सरकारने धोरण आखले असल्याने गांडूळ खताला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे मागणी ही मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे मार्केटिंग करण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रशिक्षण आवश्यक आहे ते प्रशिक्षण उमेद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या मार्फत देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू,असे अभिवचन मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले.पंचायत समिती कृषी विभाग , महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व उमेद अभियांतर्गत साजिरी महिला उत्पादक गटाच्या गांडूळ खत प्रकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आवर्जून भेट दिली.त्यावेळी पुजार बोलत होते.
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून कौंढर काळसूर येथे १२बचत समुह कार्यरत आहेत. या बचत समुहाला उद्योग उभारण्यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाने पंचायत समिती कार्यालयात तसेच असगोली येथील व्याघ्रांबरी बचत गटाच्या प्रकल्पावर प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यातून प्रेरणा घेऊन महिलांनी कौंढर काळसूर येथे ‘साजिरी’ महिला उत्पादक गटाची स्थापना करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला. आणि
केवळ दोन महिन्याच्या अल्पावधीत बचत समुहाच्या महिलांनी पंचायत समिती कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार यांनी महिलांचे भरभरून कौतुकही केले.साजिरी महिला उत्पादक गटाच्या या प्रकल्पासाठी चंद्रकांत महाडिक यांनी बचत समुहाला कराराने जागा उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पाला सुमारे २ लाख १५ हजार एवढा खर्च लागला असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गांडूळखताच्या ८ बेडसाठी सुमारे ८५-८८ हजार रुपये उपलब्ध होणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार हे विकास कामांचा आढावा घेण्यासाठी गुहागर दौऱ्यावर आले असताना कौंढरकाळसूर येथील साजिरी उत्पादक गटाच्या गांडूळ खत प्रकल्पाला आवर्जून भेट दिली.
यावेळी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई ,गट विकास अधिकारी प्रशांत राऊत , सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर , कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, उमेद अभियानाच्या व्यवस्थपक प्राजक्ता ओक, सरपंच सिया गुजर , उपसरपंच सायली रामाणे, माजी प.स.सदस्य धनश्री मांजरेकर, ग्रामसेवक श्री. घेवडे , ग्रामरोजगार सेवक गणेश मांजरेकर, मुख्याध्यापक स्वप्नाली विचारे,शिक्षक श्री.वाघे, आरोग्य सेवक विजय विलनकर, सेंद्रिय उत्पादक शेतकरी चंद्रकांत महाडिक, ग्राम सेवा संघाच्या अध्यक्षा विनया बडदे, साजिरी उत्पादक गटाच्या अध्यक्षा ज्योती महाडिक, उपाध्यक्ष विद्या पवार, सचिव रुपाली खांडेकर, सीआरपी स्वाती महाडिक, रेश्मा रहाटे,अंकीता खांडेकर,जयश्री खांडेकर,सान्वी खांडेकर,रंजीता खांडेकर,सुभद्रा रहाटे,योगिता गीते,मधुरा गुरव, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.