स्वर्गीय सुरेश बागवे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा
आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होणार क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन!
चिपळूण | प्रतिनिधी : तालुक्यातील सावर्डे येथील शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठान तर्फे शनिवार दिनांक ४ व रविवार दिनांक ५ रोजी स्वर्गीय सुरेश लक्ष्मण बागवे स्मृती चषक प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होईल. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा सह्याद्री क्रीडा संकुलात होईल अशी माहिती या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश सावर्डेकर यांनी दिली.
सावर्डे येथील शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्राथमिक शिक्षकांसाठी क्रीडा स्पर्धा याबरोबरच समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. तसेच पोलीस भरती व करिअर मार्गदर्शन यांसारखे उपक्रम देखील राबवले जातात. यावर्षी शनिवार दिनांक ४ व रविवार दिनांक ५ रोजी स्वर्गीय सुरेश लक्ष्मण बागवे स्मृती चषक प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत जिल्हा भरातून १५ संघांनी सहभाग नोंदवला असून सुमारे २५० खेळाडू खेळणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघास १५ हजार ५५५ रुपये, उपविजेत्या संघास ११ हजार १११ रुपये तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, षटकारांचा राजा, मालिकावीर व इतर आकर्षक बक्षिसे देऊन खेळाडूंना गौरवण्यात येणार आहे.या स्पर्धेचा क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उद्धव साळवी, सचिव अरविंद भंडारी, कार्याध्यक्ष प्रकाश ठोंबरे, खजिनदार मनोज घाग,प्रसिद्धी प्रमुख संजय घाग उपक्रम समिती प्रमुख दशरथ बांबाडे यांनी केले आहे.