गुणी मुलांमुळे शाळा आणि संस्था यांचे नाव होते.गुरुमुळे आयुष्य घडते.सातत्य,एकाग्रता आणि आकलनक्षमता जागृत ठेवली तर ज्ञानाचा साठा आपोआप होत जातो. शाळेत जे शिकवले जाते त्याकडे एकतानतेने लक्ष दिलेत तर ज्ञान आत्मसात होईल.असे मौलिक मार्गदर्शन श्री.राजाभाऊ शेंबेकर यांनी युनायटेड इंग्लिश स्कूल शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्धाटन कार्यक्रम प्रसंगी केले.
दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्धाटन सकाळी ८:०० वाजता प्रमुख पाहुण्याच्या हस्ते अतिशय दिमाखदार सोहळ्याने संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी(१९८० एस.एस.सी ) श्री.राजाभाऊ शेंबेकर आणि डॉ.श्री.अमेय बेडेकर ( एस.एस.सी २००३ बॅच) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या झांज पथकाकडून वाजत – गाजत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.प्रमुख मान्यवर यांनी श्री देव परशुराम यांचे पूजन केले.सभागृहात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यावेळी गुरुकुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, ईशस्तवन गायले.डॉ.अमेय बेडेकर यांनी श्रीफळ वाढवून यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचे अधिकृत उद्घाटन केले.
स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारा हा एक सणच आहे.एकत्रित येऊन साजरा केला जाणारा सण सर्वांनी छानपणे साजरा करा असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वप्नाली पाटील मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकेत म्हटले.
स्नेहसंमेलन प्रमुख पाहुणे श्री.राजाभाऊ शेंबेकर यांचा परिचय शाळेचे शिक्षक श्री.संदीप काणेकर सर यांनी करून दिला तर डॉ.अमेय बेडेकर यांचा परिचय श्री.मंगेश मोने सर यांनी करून दिला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वप्नाली पाटील मॅडम यांच्या हस्ते श्री.राजाभाऊ शेंबेकर यांचा आणि उपमुख्याध्यापक श्री.संजय बनसोडे सर यांच्या हस्ते डॉ.अमेय बेडेकर यांचा शाल, श्रीफळ,तसेच संस्थेचे मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी गायन,वादन,क्रीडा,लेखन,वक्तृत्वयासारख्या विविध कलागुणामध्ये निपुण प्राप्त केले आहे अशा विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
स्नेहसंमेलनच्या निमित्ताने यावर्षीचे विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत साळवी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी कु.जान्हवी महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ.अमेय बेडेकर यांनी आपल्या भाषणात शाळा विद्यार्थ्यांना घडवते, विद्यार्थ्याकडे दूरदृष्टी हवी,आयुष्यात ध्येयवेडे बना,सातत्यपूर्ण कठोर परिश्रम ठेवा म्हणजे यश हे मिळतेच.शाळा हे सर्वांगिण विकासाचे केंद्र आहे.विद्यार्थ्यांने आपले संस्कार आणि मूल्य कधी विसरू नयेत.केवळ पैश्याच्या आणि नंबरच्या मागे लागून व्यक्तिमत्त्व घडत नाही.शरीराची जोपासना करण्यासाठी शरीराकडे लक्ष द्या,सोशल मीडियाचा वापर अतिशय जपून करा,वाचन करा आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे श्रेष्ठ बनण्यापेक्षा उत्तम बना असा संदेश त्यांनी मुलांना दिला.
यावर्षीचे स्नेहसंमेलन प्रमुख श्री.भगवान खाडे सर यांनी विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाच्या शुभेच्छा दिल्या.शाळा संकेत आणि नियमांचे पालन करून याचा आनंद घ्या असे सांगितले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रमुख पाहुणे श्री.राजाभाऊ शेंबेकर यांनी ‘माझे जीवन गाणे’ हे गीत गाऊन उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले.
स्नेहसंमेलन निमित्त आयोजित चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ.अमेय बेडेकर यांनी केले.तर रांगोळी आणि फनी गेम्स चे उद्घाटन श्री. राजाभाऊ शेंबेकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वप्नाली पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.संजय बनसोडे यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ.मानसी पेढांबकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वप्नाली पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.संजय बनसोडे सर, पर्यवेक्षक श्री.संदीप मुंडेकर सर शिक्षक प्रतिनिधी श्री.भगवान खाडे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी,विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












