कांटे आणि कोट या दोन गावांना जोडणारा बेनी नदीवरील पूल
कोटचे माजी सरपंच शांताराम सुर्वे यांची मागणी
लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील झापडे- कांटे आणि कोट या गावांना जोडणाऱ्या बेनी नदीवरील पूल बांधण्यात यावा, अशी मागणी कोट गावचे माजी सरपंच शांताराम तथा आबा सुर्वे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांना सादर केले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात शांताराम सुर्वे यांनी म्हटले आहे की, लांजा तालुक्यातील कांटे आणि कोट या दोन गावांना जोडणारा बेनी नदीवरील पूल होणे अत्यावश्यक बाब बनली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही ही मागणी सातत्याने करत आहोत. लांजा झापडे कांटे-कोट हा रस्ता तालुक्याच्या पश्चिम विभागातील दोन मोठ्या गावांना जोडणार आहे. तसेच सदरचा रस्ता इतर जिल्हा मार्ग पंधरा असून १६ किमी लांबीचा आहे .बेनी नदीवरील पूल झाल्यास त्याचा फायदा झापडे कांटे कोटसह भडे ,लावगण, खानवली, आगवे, वाडीलिंबू व वाघ्रट, बेनी, हर्चे या गावांना होणार आहे तसेच या मार्गे पावस- रत्नागिरी हा दळणवळणाचा अतिशय जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा कोट कांटे सह दशक्रोशीतील गावांना होणार आहे.
सदरचा नियोजित पूलाचा सर्वे व अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन ते तीन वेळा करण्यात आलेला आहे. मात्र पूल होणे बाबत संबंधीत विभागाकडे व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा व पत्रव्यवहार करून देखील अद्यापही हा पूल मंजूर झालेला नाही. त्यामुळे झापडे कांटे कोट दशक्रोशीतील ग्रामस्थांची पुलाबाबत असणारी रास्त मागणी लक्षात घेऊन या पुलाला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच शांताराम सुर्वे यांनी केली आहे .दरम्यान पूल मंजुरीबाबत कार्यवाही न झाल्यास येत्या १ मे रोजी ग्रामस्थांसमवेत उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल असे देखील शांताराम तथा आबा सुर्वे यांनी दिला आहे.











