अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी रोपांचे वाटप

नारळ, सुपारी रोपे, काळी मिरी जायफळ,दालचिनी यांचा समावेश

रत्नागिरी- येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, रत्नागिरी यांचे मार्फत केंद्र सरकार पुरस्कृत भारतीय कृषी अनुसंधान परिषद -अखिल भारतीय समन्वित ताडमाड संशोधन प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती उपप्रकल्प योजनेमध्ये जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांना शेतीप्रयोगी वेगवेगळी साधनसामग्री पुरविणे अंतर्भूत आहे. सदर योजनेचा फायदा लाभार्थी शेतकऱ्यांना होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, गुहागर यांच्या मदतीने तालुक्यातील शिवने येथे डॉ. किरण मालशे, कृषी विद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, रत्नागिरी यांच्या हस्ते उपस्थित गुहागर तालुक्यातील 62 लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी 10 नारळ रोपे, ४ काळी मिरी रोपे, ४ जायफळ कलमे, ४ दालचिनी कलमे, ४ सुपारी रोपे, 100 नग ब्रॅकोन मित्र कीटक इत्यादी निविष्ठा साहित्य मोफत वितरित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरपंच सौ. मनस्वी महेंद्र ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी, श्री. अमोल क्षीरसागर, मंडळ कृषी अधिकारी सौ. भक्ती यादव उपस्थित होत्या.

तसेच तांत्रिक क्षेत्रात डॉ . किरण मालशे, कृषीविद्यावेता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये यांनी नारळ लागवड तंत्रज्ञान, डॉ. सुनील गव्हाळे, संशोधन अधिकारी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये यांनी मसाला पिके लागवड तंत्रज्ञान व डॉ. संतोष वानखेडे, कीटकशास्त्रज्ञ प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये यांनी नारळ व आंतर पिकाचे कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. किरण मालशे, कृषीविद्यावेता, प्रादेशिक नारायण संशोधन केंद्र, भाट्ये यांनी केले तर या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. संतोष वानखेडे, कीटकशास्त्रज्ञ, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सुनील गव्हाळे यांनी केले. या प्रशिक्षण व वितरण कार्यक्रमासाठी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.