चिपळूण येथील लोककला गौरव सोहळा ठरला समाज मनाचा आरसा

Google search engine
Google search engine

अनेक लोक कलावंतांचा लोककला गौरव सोहळ्यात पुरस्काराने सन्मान

संतोष कुळे | चिपळूण : कोकणची लाल माती आणि या लाल मातीत कलावंतांनी आपल्या कलेतून जतन केलेल्या लोककला आजही रसिकांच्या मनात कायम आहेत. याच कलेतून त्यातून निर्माण झालेला लोकरंग हे कोकणच्या संस्कृतीचे आणि सौंदर्याचं एक विशिष्ट लक्षण आहे. कोकण ही सांस्कृतिक भूमीचे माहेरघर आहे आणि अशाच कोकणातील लोक कलावंतांना त्यांनी केलेल्या कलेसंदर्भातली सेवा आणि त्या सेवेची पोचपावती देण्यासाठी कोकण व्हिजन फाउंडेशन, कोकण रिपोर्टर आणि सह्याद्री समाचार न्यूज यांच्यावतीने आयोजित लोककला गौरव सोहळा 2023 या सोहळ्यामध्ये रविवार 5 मार्च रोजी चिपळूण येथील बांदल स्कूलच्या सभागृहात लोककलावंतांचा गौरव सोहळा पार पडला.

कोकणच्या या भूमीत अनेक लोककलांची बीजे वर्षानुवर्षे रुजलेली आहेत. याच लोककला आपली संस्कृती आणि बोली भाषेचे दर्शन घडवत असतात. लोककलावंत आपल्या चेहऱ्याला कलेचा रंग लावत रसिकांचे मनोरंजन करत असतो. याच कलेतून समाज प्रबोधनाचे आणि जनजागृतीचे काम सुद्धा चालत आलेले आहे. बदलत्या काळानुसार सुद्धा या सर्व लोककलांमध्ये बदल पहावयास मिळत आहे. हा बदल सुद्धा रसिक वर्ग तितक्याच प्रेमाने स्वीकारताना दिसतो. कोकणातील नमन, भारुड, जाखडी नृत्य, गोंधळ, काटखेल व जलसा अशा विविध लोककला आजही या लाल मातीमध्ये सादर होताना दिसतात. मात्र या कला सादर करणारे लोक कलावंत आजही अनेक सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. लोककलावंतांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करून त्यांनी केलेल्या कलेची पोच पावती मिळावी यासाठीच चिपळूण येथे लोककला गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोकण व्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कुमार शिंदे, कोकण रिपोर्टर संपादक मकरंद भागवत आणि सह्याद्री समाचार न्यूज संपादक शाहीर खेरटकर या सर्वांनी मिळून लोककला गौरव सोहळा 2023 आयोजन केले होते. या कार्यक्रमाला चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आ. शेखर निकम, माजी आ. सदानंद चव्हाण, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विकास जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, उद्योजक चंद्रकांत भोजने, नमन लोककला संस्था अध्यक्ष रवींद्र मटकर , कलगीतुरा समन्वय समिती अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे, जेष्ठ पत्रकार सतीश कदम, लियाकत शहा असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभीच लोककलेचे दर्शन घडविताना आपली आबिटगाव येथील संजय उर्फ बाबा भागडे यांच्या नमन मंडळातील कलाकारांनी गणेश वंदना सादर करत रसिकांची मने जिंकली. त्यानंतर खऱ्या अर्थाने या लोककलावंताच्या सोहळ्याला सुरुवात झाली. प्रथम लोकशाहीर कीर्तनकार आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने शक्ती तुरा कलेला नव संजीवनी दिली असे शाहीर दत्ताराम आयरे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. त्यानंतर चिपळूण येथील सुधीर शिंदे यांना समाज रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी रसिकांनी टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांच्या कलेला आणि पुरस्काराला दाद दिली. यावेळी उद्योजक प्रशांत यादव आ. शेखर निकम , माजी आ. सदानंद चव्हाण यांच्या हस्तेत लोककला भूषण पुरस्कारांमधील रायगड जिल्ह्यातील तुरेवाले आणि पहाडी आवाजाचा बादशाह अशी ओळख असणारे शाहीर रामचंद्र घाणेकर यांना लोककला भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर लांजा येथील शाहिर तुषार पंदेरे, गुहागर येथील शाहीर अर्जुन भुवड, यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. त्यानंतर नमन विभागामधील पुरस्कार देताना गुहागरचे सुपुत्र संदीप कानसे, संगमेश्वरचे नामवंत कलावंत आणि शाहीर भिकाजी चोग, आबिटगाव येथील संजय (बाबा ) भागडे, लांजा येथील चंद्रकांत पालकर, आणि गुहागर येथील सुधाकर गांवनकर या सर्वांना नमन विभागातील लोककला भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

त्यानंतर भेदिक शाहिरी विभागामध्ये संगमेश्वर येथील शाहीर गोपाळ वाजे, कीर्तन विभागातील हभप रुपेश महाराज शिर्के वेहळे यांना लोककला भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. पालखी विभागामध्ये मार्गताम्हाणे येथील पद्मावती पालखी नित्य कलापथक यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जलसा विभागामध्ये वैभव कला जलसा मंडळ ओमली, काटखेले विभाग श्री चंडिका देवी जुने मंदिर कलापथक खेर्डी दापोली आणि गोंधळ विभाग श्री शंकर यादव ओमळी या सर्वांना लोककला भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याचबरोबर लोककला प्रेरणा पुरस्काराने गुहागर येथील शिवण्या मांडवकर तर समाजप्रबोधन पुरस्कार शाहिद खेरटकर यांना या पुरस्काराने गौविण्यात आले. खऱ्या लोक कलावंतांची दखल घेत त्यांचा गौरव करत कोकण व्हिजन फाउंडेशन, कोकण रिपोर्टर आणि सह्याद्री समाचार न्यूज यांनी त्यांच्या कलेला दाद दिली आहे. यावेळी लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोक कलावंतांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू असे लोककलागौरवाचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. आणि कलाकारांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मिळाली पाहिजे असे उदगार आ. शेखर निकम यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. नमन कलेतील अपंग असून सुद्धा नमन कलेत बहारदार कामगिरी करणारे कलावंत चंद्रकांत पालकर यांना पुरस्कार स्वीकारताना डोळ्यांमध्ये अश्रू आले. तर भेदिक शाहीरी करणारे गोपाळ वाजे यांना पुरस्कार मिळाल्यानंतर गावात त्यांची मिरवणूक करण्यात आली असे लोककलांचा आदर करणारी सुद्धा समाजामध्ये लोक असल्याचे या सोहळ्यातून दिसून आले. हा सोहळा निश्चितच इतर कलावंतांना आणि रसिकांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करून देण्यासाठी प्रेरणादायी व आशावादी ठरणार आहे.