लोककलेतून योजनांचा जागर

रत्नागिरी : शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला माध्यमाचा वापर जिल्ह्यात करण्यात येत आहे. कलापथकांच्या माध्यमातून शासनाने कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित मोहिम 11 मार्च पासून सुरु करण्यात आली आहे.या मोहिमेमध्ये भाकर संस्था लांजा, आधार सेवा ट्रस्ट रत्नागिरी व शाहीर रत्नाकर महाकाळ लोककला मंच, खेड, संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच देवरुख, गुरु सामाजिक सांस्कृतिक कलामचं कोर्ले लांजा या संस्थांमार्फत कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत.

दापोली तालुक्यातील फणसू, असोंड, गावतळे, वाकवली, दापोली बसस्थानक आणि खेड तालुक्यातील दाभिळ, खेड बसस्थानक, तीन बत्ती नाका येथे रत्नाकर महाकाळ लोककला मंच या कलापथकाने आणि लांजा तालुक्यातील वाडीलिंबू, कोट, पूनस, आंजणारी, लांजा बसस्थानक येथे भाकर संस्थेने कार्यक्रम सादर केले.
चिपळूण तालुक्यातील चिंचनाका, सावर्डे, बहादूरशेख नाका येथे संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच, या संस्थेने आणि रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, आठवडा बाजार, कुवारबाव, नाचणे, रेल्वेस्टेशन, भाट्ये समुद्रकिनारा, मांडवी समुद्रकिनारा येथे आधार सेवा ट्रस्ट यांनी कार्यक्रम सादर केले.

ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात एकूण 84 ठिकाणी या कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून शासनाने घेतलेल्या विविध विकासात्मक निर्णयांची, शासनमार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे. शासनाने राबविलेले विविध उपक्रम, विविध विभागांच्या योजनांची माहिती कलापथकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या या लोकजागराचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.