केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचले कुटुंब 

खासकीलवाडा येथे वादळी वाऱ्यासह पावसाने कोसळले घरावर झाड 

सावंतवाडी । प्रतिनिधी : मध्यरात्री अडीज वाजण्याची वेळ. सारे कुटुंब गाढ झोपेत असताना अचानकपणे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात घरालगतचा जीर्ण वृक्ष घरावर कोसळला आणि काहीही कळायच्या आत घराचे छप्पर तुटून कौले घरात कोसळली. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्या खाली झोपलेल्या कुटुंबातील लहान मुलांसह कोणालाही कसलीही दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे तेथेच एका पाळण्यात एक चिमुरडे निवांत झोपले होते. पण देवाच्या कृपेनेच आमचे सर्व कुटुंब वाचले, अशी भावना साश्रू नयनांनी पावसकर यांनी व्यक्त करीत देवाचे आभार मानले.

सावंतवाडी शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने काल मध्यरात्री शहरात जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसात खासकीलवाडा भागात भले मोठे झाड घरावर सावंतवाडीतील हॉटेल व्यावसायिक अजित पावसकर यांच्या घरावर कोसळले.दैव बलवत्तर म्हणून तेथेच असलेल्या वीज वाहीन्यांना झाड अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

याबाबतची माहीती मिळताच माजी नगरसेवक उमाकांत वारंग व परिसरात राहणाऱ्या नागरीकांनी धाव घेवून पावसकर कुटूंबाला सहकार्य केले. सकाळी पालिका प्रशासनाने घरावर पडलेले झाड दुर केले. काल मध्यरात्री शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला यावेळी श्री. पावसकर कुटूंब गाढ झोपेत असताना भले मोठे झाड त्यांच्या घरावर कोसळले, यात काही कळण्याआधीच छप्पराचा अर्धा भाग तुटून पाणी आत येवू लागले, नेमके काय झाले हे समजण्या आधीच छप्पर तुटून पडल्याने पावसकर कुटूंब घाबरले. यावेळी झाड पडल्याचा आवाज ऐकताच बाजूला राहणाऱ्या एकनाथ सावंत, संदीप सावंत, मिलिंद पाटील, विनायक पाटील, नारायण नाईक नागरीकांनी यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांना

धीर दिला.

त्यानंतर सकाळी पालिका प्रशासनाच्या मदतीने घरावर पडलेले झाड बाजूला करण्यात आले. यावेळी पालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी पाडुरंग नाटेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी मदत केली. त्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी त्या ठीकाणी भेट दिली. दरम्यान नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सुचना संबधित विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच तुटलेल्या वीज वाहीन्या पुर्ववत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे, असे श्री. वारंग यांनी सांगितले.

दरम्यान, भले मोठे झाड कोसळल्यानंतर सुध्दा केवळ दैव बलवत्तर म्हणून आमचे कुटूंब वाचले, असे सांगून श्री. पावसकर यांनी देवाचे आभार मानले आहेत, यात त्यांच्या घरासह सामानाचे अंदाजे १० लाखांचे नुकसान झाले आहे.