अमित खोत | मालवण : मालवण येथे दाखल झालेल्या शिवप्रताप नाटकातील सर्व महिला कलाकारांचे मालवणातील शिवप्रेमी आणि भाजपा पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशामागे त्यांच्या आई जिजाऊ होत्या. आता सर्वांनाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. हाच ध्यास, वसा घेऊन परेल येथील स्वयंसिद्धा महिला मंडळाचे ‘शिवप्रताप’ हे नाटक मामा वरेरकर नाट्यगृहात सादर झाले. संपूर्ण नाटकात महिलांच्याच भूमिका होत्या. ४५ महिला कलाकारांच्या या नाट्य प्रयोगाला दाद देण्यासाठी मालवणातील रसिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. मालवण नाट्यगृहाच्या बाहेर हाऊसफुल्लचा फलक झळकला होता.
नाटकातील शिवाजी महाराज, अफजल खान सर्वच पात्रे महिलांनी साकारली होती. नाटक पाहताना अंगावर शहारे उभे राहतात. नाटकात आई जिजाऊ व महाराजांचे संवाद प्रेक्षकांना स्तब्ध करतात. बडी बेगम व अफजल खानचा दरबार आदींचे नेपथ्यही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. नाटकात संगीतही असून देवीचा जागरही त्यात होतो. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, महाराज आणि गोपीनाथ पंत यांच्या भेटीचे प्रसंग मनोवेधक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान गळाभेटीतून वधाचा प्रसंग तर नाटकात हायलाईट ठरतो. स्वयंसिद्धा महिला मंडळातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना म्हणून शिवजयंतीनिमित्त पोवाडा, छोटेसे कथात्मक नाटक, महाराजांच्या इतिहासावर आधारित एकांकिका अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी सादर व्हायचे. मात्र, २०२३ मध्ये ‘शिवप्रताप’ हे हौशी रंगमंचावर दोन अंकी नाटक सादर केले आणि बघता- बघता नाटक व्यावसायिक रंगभूमीवरही नावारुपास आले. स्वयंसिद्धा महिला मंडळ हे सांस्कृतिक मंडळ आहे. रुढी परंपरा जपणे, त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, अशा ध्येयाने प्रेरित होऊन मंडळाचे कार्य सुरू आहे. या नाटकाचे आतापर्यंत ठाणे, परळ आदी भागात अनेक प्रयोग झाले. त्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. महाराजांचा हा इतिहास महिलांच्या नव्या रुपात देशभरात पोहोचविण्यासाठी ही चळवळ सुरू आहे. पुस्तकात वाचलेला इतिहास जीवंत स्वरुपात पोहोचविण्याचा स्वयंसिद्धा महिला मंडळाचा प्रयत्न सुरू आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी महिलांना शुभेच्छा देताना या नाटकाचे प्रयोग देश आणि विदेशातही होतील. अश्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या.
भाजपा महिला तालुकापध्यक्षा पूजा करलकर यांनी महिलांनी साकरलेले नाटक म्हणजे आजच्या पिढीसाठी एक आदर्शवत पाऊल असल्याचे सांगितले. यावेळी उद्योजक राजन परूळेकर, संतोष परब, सुशील शेडगे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष तथा संचालक आबा हडकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, ललित चव्हाण, महिमा मयेकर, पूजा वेरलकर, तुलसी चव्हाण, स्वाती हडकर, सुप्रिया पेंडूरकर, अमिता न्हिवेकर, नाटकाचे संयोजक विकास पावसकर, बाबू धुरी, तारका चव्हाण, राजू बिडये, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, तन्वी चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.












