वेंगुर्ला येथे शिवसेना पदाधिकारी यांचे प्रत्युत्तर..
वेंगुर्ले : प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदार संघात दीपक केसरकर आमदार झाल्यापासून कोट्यवधी रुपयांचा निधी आणलेला आहे. ज्या उबाठा गटाच्या वेंगुर्ला तालुकाप्रमुखांची राजकिय कारकीर्द दीपक केसरकर यांच्याबरोबर राहून सुरू झाली त्यांच्यावर टीका करताना त्यांनी थोडे भान ठेवावे. आपल्या वरिष्ठांना व विनायक राऊत यांना खुश करण्यासाठी जर अशी टीका केसरकर यांच्यावर होत असेल तर ते हास्यास्पद असल्याचे प्रतिउत्तर वेंगुर्ला येथे शिवसेना पदाधिकारी यांनी दिले आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम आदी बोलत होते.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर म्हणाले को, फक्त विनायक राऊत यांच्याकडून आपल्या पाठीवर थाप मिळावी म्हणून जर आपण दीपक केसरकर यांच्यावर टीका करत असाल तर या निवडणुकीत जनताच आपल्याला योग्य उत्तर देईल. दीपक केसरकर यांनी विकासकामांसाठी या मतदार संघात आणलेल्या निधीचे आकडे जर त्यांना खोटे वाटत असतील तर त्याची अधिकृत माहिती शासनाच्या अधिकाऱ्यांकडून उबाठा गटाच्या तीनही तालुकाप्रमुखांनी घ्यावी आणि नंतरच अशी टीका करावी असेही श्री मांजरेकर म्हणाले.
तसेच याबवेळी बोलताना सचिन वालावलकर म्हणाले की, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर्व घटकातील लोकांना न्याय मिळावा यासाठी सत्तेमध्ये असताना व नसताना सुद्धा या जिल्हा व मतदार संघाच्या विकासासाठी सतत प्रयत्न केला आहे. २२-२३ व २३-२४ या दोन वर्षात सुमारे १ हजार कोटी रुपये एवढा निधी या जिल्ह्यात दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मिळाला आहे. प्रत्येक रस्ता हा डांबरीकरण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपक केसरकर यांच्या या कामाचे स्वरूप बघून या भागात कोट्यवधींचा निधी दिला आहे. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून १५० कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. महिला , शेतकरी, मच्छिमार, आंबा – काजू बागायतदार यांच्या साठी विविध योजना केसरकर यांनी आणल्या आहेत. २०२३ व २४ या वर्षात सुमारे २७२ कोटी रुपये निधी रस्त्यांसाठी आला आहे. सावंतवाडी नगरपालिकेसाठी १०० तोटी, वेंगुर्ला नगरपालिकेसाठी २५ कोटी तर व दोडामार्ग साठी १० कोटी एवढा निधी देण्यात आला आहे.
गेली अनेक वर्षे नावाबाग येथील मच्छिमार बांधवांना आपल्या बोटी गाळ साचल्याने समुद्रात नेण्यासाठी अडथळा होत होता यासाठी सुमारे २३ कोटी रुपये एवढा निधी खर्च करून आज समुद्रात बंधारा होत आहेत. वेंगुर्ले बंदर सुशोभिकरण यासाठी सुमारे ४३ कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. यामुळे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाप्रमुख बाळू परब व दोडामार्ग तालुकाप्रमुख बबन गवस यांनी या मतदार संघात दीपक केसरकर यांनी काय काम केली आहेत याचा अभ्यास करावा. व दिपक केसरकर यांनी या मतदार संघासाठी किती कोटी निधी आणला याची माहिती शासनाच्या विविध विभागातून घ्यावा असेही सचिन वालावलकर म्हणाले.
यावेळी बोलताना शहरप्रमुख उमेश येरम म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर दीपक केसरकर यांना टार्गेट करण्यात काही अर्थ नाही. शहर प्रमुख या नात्याने मी सांगू इच्छितो की, दोन वर्षांपूर्वी वेंगुर्ले शहरातील रस्त्यांची परिस्थिती फार बिकट होती आज ९५ टक्के रस्ते डांबरीकरण करून पूर्ण झाले आहेत. बॅ नाथ पै संग्रहालय, बॅडमिंटन हॉल, इनडोअर स्पर्धांसाठी हॉल, रामेश्वर मंदिर सुशोभीकरण, वेंगुर्ले मार्केट यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. केसरकर यांचा महत्वाचा प्रकल्प म्हणजे झुलता पूल आज पूर्ण होऊन अनेक पर्यटक याठिकाणी येत आहेत. जे लोक आज केसरकर यांच्यावर टीका करत आहेत तेच लोक यापूर्वी केसरकर यांच्यासोबत त्यांना गुरू मानून काम करत होते. त्यांनी आपल्या सुद्धा भागाचा विकास केसरकर यांच्या माध्यमातून करून घेतला आहे. यामुळे मी ठामपणे सांगू शकतो की वेंगुर्ले शहरातून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान होईल. असेही उमेश येरम म्हणाले. यावेळी सागरी किनारपट्टी भागाचे तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर आदी उपस्थित होते.











