विनायक राऊत यांचा फ्लोप शो…!

छोट्या सभागृहात मेळावा घेऊन मोठी गर्दी दाखवण्याची धडपड

पक्ष नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याकडे फिरविली पाठ

रत्नागिरी | प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी खा. विनायक राऊत यांनी रत्नागिरी शहरातील एका छोट्या सभागृहात मेळाव्याचे आयोजन केले होते. बसण्याची क्षमता ८००च असलेल्या या सभागृहात जेमतेम गर्दी झाली होती. दोडामार्ग ते चिपळूण दरम्यान बोलावण्यात आलेल्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्यामुळे मुख्य रस्त्यापासून एका कोपऱ्यात असलेल्या सभागृहात मेळावा घेऊन मोठी गर्दी दाखविण्याची धडपड विनायक राऊत करत होते.तर निवडणूक सर्वेत विनायक राऊत यांचा पराभव होणार असाच रिपोर्ट असल्यामुळे पक्ष नेतृत्वाने उमेदवारी अर्ज भरण्यास येणार नसल्याचे सांगून टाकले.

यापूर्वी शिवसेनेचे मेळावे गर्दीचे होत असत, मोठ्या मैदानावर घेतले जात असत मात्र उबाठा गटाच्या मेळाव्याला केवळ राजापूर, लांजा रत्नागिरी चिपळूण या चार तालुक्यातून निवडक माणसाना घेऊन गाड्या आलेल्या दिसून आल्या. मतदार संघात सिंधुदुर्ग येत असूनही तेथील उबठाच्या नेत्यांशिवाय कोणीही या मेळाव्याला उपस्थित नव्हते. गर्दी किती जमेल याचा अंदाज नसल्याने ८०० माणसांची क्षमता असलेल्या सभागृहात आयत्यावेळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सभागृहाची क्षमताच कमी असल्याने साधारण दीड हजार माणसे सामावून घेताना मोठी गर्दी झाल्याचे चित्र निर्माण केले गेले.

यावेळी मेळाव्याला उपस्थित नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वावर बोलताना राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांवर टीका केलेली दिसली मात्र एकही वक्त्याकडे स्थानिक टीका करण्यासाठी स्थानिक मुद्देच उपलब्ध नसल्याचे दिसून आले.