ऐंशी वर्षांच्या मुलांनी केला दहावीचा हीरक महोत्सव!

रत्नागिरी | प्रतिनिधी: वय वाढलं तरी मनातली मैत्रीची आस तसूभरही कमी होत नाही याचं प्रत्यंतर आपण वारंवार घेतो. अशाच ऐंशीच्या घरात पोहचलेल्या मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन आपल्या दहावीच्या बॅचचा हीरक महोत्सव साजरा करण्याचा आगळावेगळा प्रयत्न केला. त्यांच्या वर्गबंधूनी साथ देत या स्नेहसंमेलनाची रंगत वाढवली.
न्यू इंग्लिश स्कूल देवरुखच्या १९६३ सालच्या दहावीच्या बॅचचं विसावं वार्षिक स्नेहसंमेलन नुकतंच पुण्याजवळील भूगाव येथील निसर्ग छाया येथे उत्साहात साजरं झालं. विशेष म्हणजे बॅचचा हीरक महोत्सव सध्या ऐंशीच्या घरात असलेल्या हौशी मंडळींनी झोकात साजरा केला. गेली वीस वर्ष सातत्याने या समूहाचे वार्षिक स्नेहसंमेलन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. यावेळी मात्र या बॅचचे हौशी सदस्य, मौज प्रकाशन चे मुकुंद भागवत यांच्या संकल्पनेनुसार वर्तमान पत्रात जाहिरात देऊन, प्रत्यक्ष भेटी घेऊन कांचन शेठ गद्रे, माधव भागवत, केशव साने यांच्या सहकार्याने या भेटीचे नियोजन केले. २००४ साली, दहावीला चाळीस वर्षे पूर्ण झाल्यावर या समूहाचे पहिले स्नेहसंमेलन झाले.

त्यानंतर प्रत्येक वर्षी हे मित्रमंडळ दरवर्षी सातत्याने भेटत राहिले. वयोमानानुसार भेटताना आपापल्या वैवाहिक जोडीदारांना समूहात सामील करून घेतल्याने समूहाचा परीघ विस्तारला. मग मात्र सर्वांनी मिळून धार्मिक, ऐतिहासिक, निसर्गरम्य अशा अनेक ठिकाणी स्नेहसंमेलनाचा आस्वाद घेतला. सोशल मिडिया नसण्याच्या काळात एकमेकांना छापील निमंत्रण पाठवून या संमेलनाचे आयोजन केले जात असे. आता मात्र काळासोबत चालत सर्व मित्र व्हॉटसअप वर एकमेकांशी जोडले गेले आहेत.

यावर्षी दहावी बॅचला साठ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून भूगाव येथे हा मैत्रीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. जगाच्या दृष्टीने वय झालेल्या या मंडळींनी अगदी लहान मुलांच्या उत्सुकतेने एकमेकांच्या भेटीगाठी घेत, नाचगाणी म्हणत, आनंदाने एकमेकांच्या साथीने तीन चार दिवस सोबत घालवले. प्रतिभा देसाई यांनी उत्तम कल्पना लढवून संपूर्ण बॅचचा सुंदर असा बॅनर तयार केला. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने वाढत्या वयासोबत मैत्रीचे रंग अधिक गहिरे झाल्याचा अनुभव या मंडळीनी घेतला.