The ruling opposition, which is united for popularity, has a different path regarding the development work, the issue of city development in two years is in the air
मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड नगर पंचायतीचे विकासाचे प्रश्नावर गेल्या दोन वर्षापासून सत्ताधारी व विरोधक श्रेयवादामुळे वेगवेगळे भूमीका मांडत असल्याने प्रशासन सुस्त झाले आहे. जनहिताचे व जिव्हाळ्याचे प्रश्नावर तसेच विकास कामासाठी कामच होत नसल्याने सध्याचे परिस्थितीवर शहरातील नागरीकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पहील्या टर्ममधील कारभाराचा इतिहास लक्षात घेऊन येथील मतदारांनी गतवर्षी सत्ताकारणात समतोल रहावा असा निवडणुक निकाल दिला. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधक सत्ताकारणात अस्तित्वात आल्याने दोघांतील भांडणांचा लाभ आपोआपच प्रशासकीय यंत्रणेस झालेला दिसून येत आहे.
विरोधकांनी आणलेल्या विकासकामांना खो घालण्याचे काम सत्ताधारी करीत असताना सत्ताधाऱ्यांरीही विरोधकांना अडवण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीत. नगर पंचायतीचे दुसऱ्या टर्मचे सत्ता स्थापनेनंतर सत्ताधारी व विरोधकांनी किमान पाच कोटी रुपये इतका निधी शासनाकडून मंजुर करुन आणल्याचा दावा केला आहे प्रत्यक्षात एकही रुपयाचे विकासकाम होताना दिसून आलेला नाही. सत्ताधारी विरुध्द विरोधक या जंगी सामन्याचा प्रशासकीय कारभारावर परिणाम होताना दिसून आलेला आहे. दुसरीकडे शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रचारातून प्रसिध्दी मिळत असताना सत्ताधारी व विरोधक अगदी गळ्यात गळे घालून फिरताना दिसतात सार्वजनीक व्यासपिठांवरही एकत्र दिसून येतात फुकटचे श्रेय मिळत असताना जर दोघेही एकत्र असतील तर विकासकामासंदर्भात दोघांची भिन्न मते का असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित केला जावू लागला आहे. दोघांच्या संर्घषाचा फायदा यंत्रणेस झाला असून यंत्रणाही सुस्त झाल्याचे दिसून येत आहे. शहर विकासाचे प्रश्नाचे सोयरसुतक सत्ताधारी वा विरोधकांना नसल्याने जनतेमधून तीव्र नाराजी दिसुन आलेली आहे. दोघांनीही विकासकामे आम्ही केली याचे श्रेय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा शहर विकासाकरिता काम करण्याची मागणी जनतेमधून होते आहे. नगर विकासाचे विकास कामांचे श्रेय आपल्यालाच आपल्या पक्षाला मिळावे हा हट्ट व दुराग्रह सोडण्याची आवश्यकता असून या संदर्भात केवळ तत्वज्ञान मांडण्यापेक्षा विकास कामांत राजकारण न आणण्याचे दोघांचेही म्हणणे कृतीत आणण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. अन्यथा सत्ताकारणाची पुढील तीन वर्षेही एकमेकांचे पाय ओढळण्यातच निघून जातील.