पुलं अल्पावधीतच सुरू झाल्याने ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान
ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार
चिपळूण (प्रतिनिधी) :– गुहागर तालुक्यातील पालशेत-हेदवी पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला झाल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत. ग्रामस्थांतर्फे ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर यांचा सत्कार करण्यात आला.
पालशेत येथील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरची वाहतूक ठप्प होत होती. त्याचा फटका वाहनधारकांसह स्थानिक ग्रामस्थांना बसत होता. त्यामुळे या पुलाची उंची नव्याने पूल उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती.
गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आ. भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ५ कोटी रूपयांच्या निधीतून या पुलाच्या उभारणीचे काम हाती घेतले होते. या कामाचा ठेका एस. एम. चिपळूणकर या कंपनीला देण्यात आला होता. या कामाचे भूमिपूजन भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते झाले होते.पावसाळा तोंडावर असल्याने ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांच्यासमोर पूल उभारण्याचे मोठे आव्हान होते. पूल खाडी पात्रात असल्यामुळे भरती-ओहटीमुळे कामात अडचणी येत होत्या. मात्र या ठिकाणी आवश्यक साहित्य, मनुष्यबळ, मशिनरी तैनात करीत अल्पावधीतच हा देखणा व दर्जेदार पूल उभा केला. या पुलामुळे पावसाळ्यात निर्माण होणारी ग्रामस्थांची अडचण आता टळली आहे.
उपसरपंच पंकज बिर्जे यांनी पुलाचे पूजन करुन पहिली गाडी सोडली. तर ग्रामस्थांनी
ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांचा सन्मान करीत गावामार्फत आभार व्यक्त केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामसे, उपअभियंता निकम, उपसरपंच पंकज बिर्जे, कंपनीचे इंजिनिअर सुनिल मेस्त्री,
निलेश विखारे, हरेश पटेकर, महेश तोडणकर, विकास पाटील, योगेश हळये, मंगेश तोडणकर, राजू गुहागरकर, विवेक तोडणकर, माधव सुर्वे, संदीप वजरेकर, साईड सुपरव्हायझर नारायण पवार आदी अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
पावसाळ्यापूर्वी पुलाची कामे पूर्णत्वास याचे समाधान-सुरेशशेठ चिपळूणकर
ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पालशेत- हेदवी व शिरगाव दोन्ही पूल उभारणीचे काम आवाहनात्मक होते. परंतु, सर्वांच्या सहकार्याने दोन्ही पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुले होत असल्याने ग्रामस्थ विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होत असल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर यांनी दिली
चौकट
विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत- प्रशांत पालशेतकर
पालशेत गावात नवा पूल झाल्याने श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर झाली असून पावसाळ्यामध्ये होणाऱ्या त्रासापासून मुलांची सुटका झाली आहे. याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर कनिष्ठ विद्यालयाचे प्रमुख उद्योजक प्रशांत पालशेतकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते व ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर आदींचे विशेष आभार मानले आहेत.











