संगमेश्वर येथील घटना
रत्नागिरी । प्रतिनिधी
पाच वर्षांपूर्वी बेलारी बुद्रुक संगमेश्वर येथे पत्नीचे चुलत पूतण्या संदीप अर्जुन सापते (32,रा.बेलारी ब्रद्रुक संगमेश्वर) याच्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पुतण्याच्या डोक्यात फावडे मारुन त्याचा खून केला. याप्रकरणी संशयित चुलत्याला न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सखाराम बाबाजी सापते (53, रा.बेलारी बुद्रुक सापतेवाडी देवरुख ता.संगमेश्वर, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याच्या विरोधात संदीपचे वडील अर्जुन सोमा सापते (62) यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार,अर्जुनचे आपली पत्नी सविता सोबत प्रेमसंबंध असल्याचा सखाराम सापते याचा संशय होता. त्या संशयातूनच 28 जून 2019 रोजी दुपारी 3.15 वा. सुमारास त्याने अर्जुनच्या डोक्यात फावडे मारले. तर त्याची आई अरुणा हिच्या डोक्यात लाकडी होलटा मारुन या दोघांना गंभिर जखमी केले. त्यांचा हा वाद सोडवण्यासाठी सुभद्रा शिवराम सापते आणि शांती शांताराम सापते या मध्ये पडल्या असता आरोपीने त्यांनाही लाकडी होलट्याने मारहाण केली होती.
दरम्यान,गंभिर जखमी झालेले अर्जुन आणि त्याची आई अरुणा यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी अर्जुनला तपासून मृत घोषित केले. तर त्याच्या आईला पुढील उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात सखाराम सापते विरोधात भादंवि कायदा कलम 302,307,324,323,504 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तपास केल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक संग्राम पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
हा खटला न्यायालयात सुरु होता. सरकारी पक्षाचे अॅड.अनिध्द फणसेकर यांनी 18 साक्षिदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.एस.गोासावी यांनी आरोपीला भादंवि कायदा कलम 302 अन्वये जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास सहा महिने कैद. भादंवि कायदा कलम 307 मध्ये 7 वर्षे शिक्षा 3 हजार दंड तो न भरल्यास 1 महिना शिक्षा तसेच भादंवि कायदा कलम 324 अन्वये 2 वर्षे शिक्षा 1 हजार दंड न भरल्यास 10 दिवस शिक्षा अशी एकूण शिक्षा म्हणून जन्मठेप आणि 14 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यातील 13 हजार रुपये मयताच्या कुटुंबाला देण्यात येणार आहेत. या खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्विनी पाटील आणि पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हेड काँस्टेबल वर्षा चव्हाण यांनी काम पाहिले.











