मढाळ येथील बचत समुहाने केली एक एकर क्षेत्रावर सामुहिक नाचणी लागवड
गुहागर (प्रतिनिधी):वानर-माकडांसोबतच रानडुक्कर व रानरेड्यांच्या उपद्रवामुळे दिवसेंदिवस शेतकरी शेती करण्यापासून दुरावत असताना पंचायत समिती गुहागरचे गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली
मढाळ येथील ओंकार स्वयंसहाय्यता समुह व
सरस्वती स्वयंसहाय्यता बचत समुहाने एकत्र येत सामुहिक नाचणी लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सुमारे एक एकर क्षेत्रावर नाचणी लागवड केली आहे.याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
भात व नाचणी ही खरीप हंगामातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पिके असून गुहागर तालुक्यात पूर्वी रानोमाळ नाचणीचे पिके घेतली जात होती.मात्र वानर-माकडांसोबतच रानडुक्कर व रानरेड्यांच्या उपद्रवामुळे सातत्याने नुकसान सहन करण्यापेक्षा काही शेतक-यांनी नाचणीची शेतीच सोडून दिली आहे.त्यामुळे तालुक्यातील नाचणी पिकाचे क्षेत्र कमी होत चाललंय. तालुक्यातील काही गावात तर पिक कापणी प्रयोगासाठी नाचणी पिकच सापडेनासे झाले आहे. मात्र आहारात महत्वाचे पौष्टिक स्थान असलेले नाचणी हे पिक शेतक-यांनी टिकवणे आवश्यक आहे,यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून सातत्याने वेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम व प्रात्यक्षिक आयोजित करून शेतक-यांना मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अशातच सामुहिकपणे अशा पिकांची लागवड केल्यास व संरक्षण केल्यास रानटीप्राण्यांपासून पिक वाचविणे सोपे होईल हा विचार करून पंचायत समिती गुहागर ने प्रात्यक्षिक स्तरावर कोतळूक व मढाळ या गावात बचत समूहाच्या माध्यमातून हा उपक्रम केला आहे. या उपक्रमांतर्गत मढाळ येथील
ओंकार स्वयंसहाय्यता समुह व
सरस्वती स्वयंसहाय्यता समुहाने सुमारे एक एकर क्षेत्रावर नाचणी लागवड केली असून कौतुकास्पद असा उपक्रम आहे. पंचायत समितीकडून या प्रात्यक्षिक उपक्रमासाठी लागवडीसाठी लागणारे रासायनिक खत ( 19:19:19) उपलब्ध करून देण्यात आले. बचत समूहाच्या
श्रध्दा कारकर,वंदना कारकर,
शारदा पागडे, सुलोचना कारकर,
शुभांगी कारकर,साक्षी पागडे ,
प्रमिला कारकर,सलोनी कारकर,
मीनाक्षी कारकर,कला कारकर,
सार्थकी पागडे,यांनी एकत्र येत व रवींद्र कारकर,काशिराम कारकर,
संजय पागडे ,शांताराम पागडे ,
भालचंद्र कारकर,अनंत कारकर,
शांताराम कारकर,राकेश पागडे ,
सखाराम कारकर,मोहन कारकर,
संजय कारकर महेंद्र कारकर, यांच्या सहकार्याने लागवड केली आहे.यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून महिला शेतक-यांना आवश्यक मार्गदर्शन केले.












