प्रकाशनासोबतच डॉ.धनश्री लेले यांचे व्याख्यान
गौरव पोंक्षे (माखजन)
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल चे माजी विद्यार्थी विशेषतः शाळेच्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांपैकी एक, स्वातंत्र्यसैनिक कै.सदाशिव राजाराम रानडे यांनी वयाच्या २२ व्या वर्षी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वरती संक्षिप्त चरित्र नावाचे पुस्तक १५ ऑगस्ट १९२४ रोजी प्रसिद्ध केले.याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट २०२४ रोजी संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल च्या गुरुदक्षिणा सभागृहात याच पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्ती चे प्रकाशन केले जाणार आहे.हा द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळा संगमेश्वर तालुक्यात सांस्कृतिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या कलांगण संगमेश्वर,तसेच माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माखजन (सरंद),व रानडे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.
या आवृत्ती चे प्रकाशन प्रख्यात प्रवचनकार डॉ.धनश्री लेले यांच्या शुभहस्ते तर मनोरमा प्रकाशन च्या श्रीमती विद्या फडके,सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ संपदा जोगळेकर कुळकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
हा प्रकाशन सोहळा १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी सकाळी ९.३० वाजता माखजन इंग्लिश स्कूल च्या गुरुदक्षिणा सभागृहात होणार आहे.या कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी माखजन इंग्लिश स्कूल चे संगीत शिक्षक उदयोन्मुख गायक विशारद गुरव व विद्यार्थी,सावरकरांनी लिहिलेले ‘जयोस्तुते’ हे अजरामर गीत सादर करणार आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमार रानडे करणार आहेत. स्वागत,सत्कार व प्रकाशन सोहळा झाल्यावर प्रख्यात प्रवचनकार व व्याख्यात्या डॉ धनश्री लेले यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर व्याख्यान होणार आहे.या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक व कलांगण चे सक्रिय कार्यकर्ते निबंध कानिटकर करणार आहेत.
या पुस्तकाचे मूळ लेखक सदाशिव रानडे यांनी लिहिलेली पहिली आवृत्ती ही सावरकरांच्या हयातीत लिहिली होती.तर त्या पुस्तकाला साहित्य सम्राट न.चि. केळकर यांनी प्रस्तावना लाभली होती.तर आत्ताच्या दुसऱ्या आवृत्ती ला प्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर कुळकर्णी ह्यांनी प्रस्तावना लिहिली आहे.दुसऱ्या आवृत्तीत सावरकरांचा खरा इतिहास जगासमोर आणणाऱ्या अभिनेते शरद पोंक्षे यांच्या सारख्या अनेकांचे शुभसंदेश आहेत.
तर या पुस्तकामुळे सावरकरांना, त्यांच्या हयातीतच त्यांना स्वातंत्रवीर ही पदवी बहाल केल्याचा एका अर्थी हा पुरावाच आहे.पहिल्या आवृत्तीत अनेक ऐतिहासिक दस्त ऐवज सापडतात.स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९२४ ते १९३७ हा कालावधी रत्नागिरी पर्व म्हणून चिरंजीव केला.त्याच्या प्रारंभाचा साक्षीदार असलेले हे पुस्तक ऐतिहासिक दस्तऐवज आहे.
१५ ऑगस्ट १९७४ रोजी पावस च्या स्वामी स्वरुपानंदांनी समाधी घेतली.भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात पुस्तकाचे लेखक सदाशिव रानडे व स्वामी स्वरुपानंद एकाच कारागृहात होते.स्वरुपानंदांच्या समाधी घेतल्याला १५ ऑगस्ट ला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.या निमित्त स्वामी स्वरुपानंदन सेवा मंडळ पावस यांचे तर्फे स्वामींचा प्रसाद उपस्थितांना लाभणार आहे.
माखजन पंचक्रोशीत नव्हे तर आपल्या जिल्ह्यातील सामान्य व्यक्तींनी प्रतिकूल परिस्थितीत केलेला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्याग,स्वातंत्र्यवीरांचे तपस्वी जीवन,स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान,श्री स्वामी स्वरूपानंदनाचा प्रसाद यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कलांगण संगमेश्वर,माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,माखजन(सरंद),व रानडे कुटुंबीय यांनी केले आहे.