रसायन अभियांत्रिकी (Chemical Engineering) ही मानवाला सद्यस्थितीत व भविष्यात लागणाऱ्या अनेक गरजा पूर्ण करणारी शाखा आहे. या शाखेचे अंतर्गत साबण, तेल, कपडे, प्लास्टिक, पेट्रोल, डिझेल, तणनाशक, खते, पेंट्स, कागद, सौंदर्यप्रसाधने, औषधे, स्फोटके, इंधन, फायबर, नायलॉन, पॉलिस्टर, रबर, टायर, बायोगॅस, सौर ऊर्जा पॅनेल, कॉम्प्युटर मोबाईलमधील मेमरी पॅनेल, अल्कोहोल उत्पादन ई. अनेक रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या उत्पादनाकरिता उपयोग होतो. त्यामुळे या संबंधित अनेक उद्योग विश्वात या शाखेच्या अभियंत्यांची मागणी वाढत आहे. या शाखेचा राष्ट्राच्या उभारणीमध्ये सिंहाचा वाटा आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागांमधील ही जीवनशैली, गुणवत्ता बदलण्याची ताकद या शाखेत आहे.
२१ व्या शतकामध्ये रसायनिक अभियंत्याला खुप संधी आहेत. आज, रसायनिक अभियंत्याला अनेक उद्योगांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. ह्यामध्ये मूलभूत रासायनिक उत्पादने, पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल्स, बायोटेक्नॉलॉजी, कृत्रिम रबर, कृत्रिम धागे, आरोग्य सेवा, खाद्य क्षेत्र अशा अनेक ठिकाणी रासायनिक अभियंत्याला संधी उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात, कृषी क्षेत्रामध्ये देखील रासायनिक अभियंत्याला खूप संधी प्राप्त होणार आहेत. दिवसेंदिवस कमी होत चालली जमिनीची सुपीकता वाढवण्यामध्ये, रासायनिक अभियंता मोलाचा वाटा उचलू शकतो. समुद्रातील खारे पाणी पिण्यायोग्य बनवण्याचे तंत्रज्ञान अवगत असल्यामुळे, गंभीर होत चालेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रासायनिक अभियंता सोडवू शकतो.
भारतातील अनेक नामांकित संस्थांमध्ये काम करण्याची संधी रासायनिक अभियंत्याला मिळू शकते. ह्यामध्ये इंडियन ऑइल , ओ एन जी सी ( ONGC ), हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, डि आर डी ओ ( DRDO ), इसरो ( ISRO ) यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, तसेच फिनोलेक्स, रिलायन्स सारख्या खाजगी क्षेत्रातील नामांकित उद्योग समुहांमध्ये विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहेत. रासायनिक अभियंत्याला संशोधन करण्याच्या संधी देखील उपलब्ध आहेत. हया अनुशंगाने रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी देखील मिळू शकते. भारतातील रासायनिक क्षेत्र उत्पादनानुसार जागतिक स्तरावर सहाव्या आणि आशियात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या जीडीपीमध्ये सात टक्के योगदान देणारा रसायन उद्योग वस्त्रोद्योग, फार्मास्युटिकल्स आणि अॅग्रोकेमिकल्स सारख्या विविध उद्योगांसाठी एक प्रमुख पुरवठादार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये केंद्र सरकारने रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागाला २०. ९३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची तरतूद केली. ही तरतूद रासायनिक क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी आणि अधिक विकसित करण्यासाठी आहे. भारतामध्ये ११,००० पेक्षा जास्त कारखाने आहेत, जे ८०,००० पेक्षा जास्त रसायने बनवतात. या कारखान्यांची वार्षिक वाढ ९ % पेक्षा जास्त आहे. २०१६ ते २०२१ दरम्यान ही वाढ १७ % होती. भारतातील रासायनिक कारखान्यांची एकूण मालमत्ता सुमारे २०० बिलियन डॉलर्स आहे. ए.आय.सी.टी.इ नुसार महाराष्ट्राची २०२२-२३ ची सर्व अभियांत्रिकीची क्षमता २ लाख ५९ हजार ३६४ एवढी आहे त्यात डिप्लोमाची १ लाख ८ हजार २४२ व डिग्रीची १ लाख ६७ हजार १२३ एवढे आहे. महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ मुंबई नुसार केमिकल इंजिनिअरिंगची क्षमता फक्त ९०० एवढी आहे म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या हजार इंजिनियर्स मागे फक्त आठ ते नऊ एवढे केमिकल इंजिनियर्स आहेत या सर्वांचा विचार करता नोकरी करता स्पर्धा कमी व संधी जास्त उपलब्ध आहेत. फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी मधील रासायनिक अभियांत्रिकी विभागाने, कोकणातील विद्यार्थ्यांना रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये करियर घडवण्याची संधी प्राप्त करून दिली आहे.
हया विभागाची सुरुवात २००८ साली झाली. संपूर्ण कोकणामध्ये दर्जेदार रासायनिक अभियांत्रिकी शिक्षणा देणारे हे महाविद्यालय आहे. अद्यायावत आणि प्रशस्त प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यपक वर्ग हया विभागाच्या जमेच्या बाजू आहेत. सर्व लॅबोरेटोरी रासायनिक अभियांत्रिकीच्या विविध विषयातील प्रात्येक्षिक घेण्यास सुसज्ज आहेत. विद्यार्थ्यांना रासायनिक अभियांत्रिकीमधील विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी करियर घडवण्यासाठी तयार करणे हे विभागाचे मुख्य ध्येय आहे. वर नमूद केलेल्या विविध सार्वजनिक क्षेत्रातील आणि नामांकित खाजगी क्षेत्रातील उद्योगसमूहांमध्ये कार्यरत होण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यासाठी विभाग सतत कार्यरत आहे. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुणांचा विकासासाठी विभाग सतत प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांसाठी, रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रातील नामांकित व्यक्तिंची व्याख्याने नियमितपणे आयोजित केली जातात. तसेच
विद्यार्थ्यांना औद्योगिक माहिती मिळण्यासाठी औद्योगिक साहिलींचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबाबत रुची निर्माण करण्याचे काम देखील विभाग करत आहे. ह्याचा उद्देश विदयार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे हा आहे. विदयार्थ्यांना उद्योजक बनावे ह्यासाठी देखील विभागाकडून प्रयत्न केले जातात. त्यामुळे, ह्या भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यामध्ये विदयार्थ्यांचा सहभाग होईल. रासयनिक अभियांत्रिकी विभागाचे अनेक माजी विद्यार्थी नामांकित उद्योग समूहांमध्ये कार्यरत आहेत. ह्यामध्ये भारत पेट्रोलियम, ओ एन जी सी ( ONGC ), फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि., विनती ऑर्गॅनिकस लि., बालाजी अमाईन्स, घरडा केमिकल्स लि., व्ही ए व्ही ( VAV ) लाईफ सायन्सेस प्रा. लि, रिलायन्स इत्यादींचा
प्रामुख्याने समावेश आहे. काही माजी विद्यार्थी भारतातील आणि परदेशातील नामांकित शिक्षण संस्थेतुन उच्च शिक्षण घेत आहेत. अशा प्रकारे रासायनिक अभियांत्रिकीची पदवी घेण्याची उत्तम संधी रासायनिक अभियांत्रिकी विभागाने कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ सर्व इच्छुक विद्याथ्यांनी जरूर घ्यावा.
डॉ. नितीन कणसे
विभागप्रमुख, रसायन अभियांत्रिकी
फिनोलेक्स इंजीनियरिंग कॉलेज रत्नागिरी










