रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश लागू

कलम 37 (1) (3)  अन्वये आदेश लागू 

रत्नागिरी :  जिल्ह्यात 01 मे 2023 रोजी कामगार दिन साजरा करण्यात येणार असून त्याअनुषंगाने विविध ठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच 05 मे 2023 रोजी बुध्द पौर्णिमा हा सण साजरा  करण्यात येणार आहे.

राजापूर तालुक्यातील बारसु, धोपेश्वर, पन्हेळे तर्फे राजापूर, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ व आजुबाजूच्या परिसरात रिफायनरी प्रकल्पाचे अुनषंगाने 24 एप्रिल 2023 रोजीपासून माती परिक्षणासाठी ड्रिलींगचे कामास सुरुवात करण्यात येणार आहे. सदर कामास प्रकल्प बाधीत गावातील काही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून ड्रिलींगचे कामादरम्यान स्थानिकांकडून विरोध होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरीकांकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. अशावेळी आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात येत आहे.  अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सन 1951 चा कायदा 22 वा नुसार 27 एप्रिल 2023  रोजी चे 00.01 वा. पासून ते 11 मे 2023 रोजी 24.00 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे  या आदेशान्वये वरील कालावधीत खालील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे.

शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही  वस्तू घेवून फिरणे,  अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्रे फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर निती याविरुध्द अशी  किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, अगर सोंग आणणे, अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.  इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांनी विनापरवानगी एकत्र येणे या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.

सदरचे आदेश अंत्ययात्रा, धार्मिक विधी,  लग्नसोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी या बाबीना लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही, असे अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी आदेशीत केले आहे.