मविआला मोठा धक्का! विद्यमान खासदारासोबत काँग्रेस नेता मागत आहे बंडखोरासाठी मते

नागपूर : माजी मंत्री सुनील केदार आणि खासदार श्याम बर्वे हे रामटेक येथील महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल बरबटेंविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या राजेंद्र मुळक यांच्यासाठी प्रचार करीत आहेत. तसेच उमरेड येथील काँग्रेसचे उमेदवार संजय मेश्राम यांच्यासाठी स्वत: बंडखोर मुळक यांनी सभा घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे स्पष्ट असून आघाडीत अस्वस्थता आहे. काँग्रेसने नुकताच बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांना पक्षातून हकालपट्टी केली होती, मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा खुलेआम प्रचार करत आहे. यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

यंदा रामटेक येथून माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करीत त्यांना निलंबनही केले. आज सकाळी रामटेक विधानसभा मतदारसंघातील चाचेर गावात मुळक यांची प्रचार सभा झाली. तेथे काँग्रेसचे केदार आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्याम बर्वे तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे आदी उपस्थित होते. या तिघांनी मुळक यांचा प्रचार केला तसेच त्यांच्या प्रचारार्थ भाषणे दिली. काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते मुळक यांच्यासाठी काम करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रामटेक मतदारसंघात काँग्रेस पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात असल्याचे चित्र दिसून येते आहे.