लांजा (प्रतिनिधी) लांजा पोलीस ठाण्यामार्फत घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज सोमवारी संकल्प सिद्धी हॉल येथे पार पडला.
महिला सबलीकरण, सक्षमीकरण व महिला सुरक्षा अंतर्गत लांजा पोलिस ठाण्यामार्फत तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमाला लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, महिला दक्षता व महिला अत्याचार निवारण कक्ष पोलिस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्गच्या श्रीमती गायत्री पाटील हे उपस्थित होते. यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र ,रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आगामी वाटचालीसाठी लांजा पोलीस स्टेशन कडून शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच संबंधित प्रशालेच्या शिक्षकांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.. या स्पर्धेत सहभागी सर्व शाळांचे तसेच सर्व विद्यार्थ्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.












