लांजा येथील बजरंग दल कार्यकर्त्यांची तत्परता
संतोष कोत्रे | लांजा -: उड्डाणपुलाच्या पिलरसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या गाईची लांजा येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमुळे सुटका झाली. आज शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता या गाईला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.
लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गाचे काम जोमाने सुरू आहे. शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलासाठी सध्या पिलर उभारणीच्या कामाने वेग घेतला आहे. लांजा साटवली फाट्या समोरील
उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात एक गाय गुरुवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री पडली होती. या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्याभोवती संरक्षणाचे दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसल्याने ही घटना घडली होती.
ही बाब लांजातील जागरूक असलेल्या बजरंग दल कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने या गाईला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. संबंधित पोलीस प्रशासनाला याची माहिती देण्यात आली.गाय पडलेला खड्डा हा खोल असल्याने तिला बाहेर काढणे सहजरीत्या शक्य नव्हते. यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने हालचाल करताना संबंधित महामार्ग ठेकेदार कंपनीच्या लोकांना माहिती दिली आणि तातडीने जेसीबी मागवण्यात आला. यानंतर गाईला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बजरंग दलाचे कार्यकर्ते या खोल खड्ड्यात उतरले. त्यानंतर गाईला दोरी व अन्य साहित्याच्या मदतीने बांधून जेसीबीच्या सहाय्याने तीला वर काढण्यात आले आणि तीची सुटका करण्यात आली .
बजरंग दल कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गायीचे प्राण वाचले. याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.











