रिफायनरी विरोधकांची संख्या २५० तर समर्थकांची ५०० पेक्षा जास्त
शासकीय अहवालातून पुढे आली धक्कादायक माहिती
राजापूर : मागील काही दिवसांपासून प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी मातीपरीक्षण सुरु आहे. येथील ग्रामस्थांनी या परीक्षणाला विरोध दर्शवला आहे. आम्हाला रिफायनरी नकोच याच भूमिकेवर ग्रामस्थ ठाम असल्याचे दिसत आहे. मात्र दुसरीकडे याच रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने अनेक सामाजिक संघटना उभ्या राहिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजापूर येथे हेलिकॉप्टर ने आले होते. रिफायनरी समर्थकांनी देखील उद्धव ठाकरे यांनी आमची भेट घ्यावी असे सांगितले होते. मात्र समर्थकांची भेट घेणे उद्धव ठाकरे यांनी टाळले. याचदरम्यान राजापूर तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या अहवालातून एक मोठी माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार गीरामादेवी कोंड येथे सुमारे १५० विरोधकांनी तर सोलगाव फाटा येथे अवघ्या १०० विरोधकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचेया अहवालात म्हटले आहे. गीरामादेवी कोंड येथे उपस्थित असणाऱ्या सुमारे ३०० ते ३५० लोकांत सुमारे १५० लोकं हि बाहेरील होती. तसेच येथे २० ते २५ पत्रकार उपस्थित होते. सोलगाव फाटा येथे उद्धव ठाकरे यांनी थांबून चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांची संख्या अवघी १०० होती व १०० ते १२५ लोकं बाहेरून आले होते. या ठिकाणी देखील २० ते २५ पत्रकार होते असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
समर्थकांची संख्या ५०० च्या पुढे
उद्धव ठाकरे यांच्या बारसू भेटीच्या पार्श्वभूमीवर आज रिफायनरी समर्थक देखील भेट घेणार होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी समर्थकांची भेट घेतली नाही. प्रकल्प बारसू येथेच करण्यात यावा या मागणीसाठी देखील आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला ५०० पेक्षा जास्त समर्थक उपस्थित होते असा अहवाल तहसिलादार शीतल जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
नाणार येथील प्रकल्प रद्द करून बारसू येथे प्रकल्पाची नवीन जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच सुचवली होती. सत्तेतून पायउतार झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका बदलत आज प्रकल्प विरोधी भूमिका घेतली आहे. रिफायनरीचे भूत बारसू वासीयांच्या मानेवर बसवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे ते पत्र कारणीभूत असल्याचा दावा काहीजण करीत आहेत. याच पार्शवभूमीवर आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे विरोधकांनी पाठ फिरवली असे आता बोलले जात आहे.











