खेड मुख्य बाजारपेठेतील नाला तुंबल्याने दुर्गंधी

खेड(प्रतिनिधी)शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेला व गेले महिनाभर प्लास्टिक कचऱ्यासह सांडपाण्याने तुंबलेला नाला साफ करण्याची सवड अद्याप नगर परिषदेला मिळालेली नाही. यामुळे परिसराच्या विद्रुपिकरणासह दुर्गंधी व डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुढे आला आहे.

 

नगरपरिषदेच्या हद्दीत असलेल्या या नाल्याच्या नूतनीकरण कामासाठी निधी प्राप्त झाला असून येथील उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत कामही सुरू आहे. नाल्याच्या

कॉक्रिटीकरणाची सुरुवात जगबुडी नदीकडील बाजूने झाली असून निवाचा चौकपर्यंत कॉक्रिटीकरण झाले आहे. नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्याचा कॉंक्रिटीकरण कामात व्यत्यय येवून नये म्हणून खडीयुक्त सिमेंटच्या पिशव्यांनी सांडपाणी अडवले जात आहे. शिवाय नूतनीकरणात नाल्यातील खोलगट पृष्ठभाग कॉक्रिटीकरणाने उचलण्यात आल्याने मागील खोलगट भागात सांडपाणी तुंबत आहे.

 

 

गेल्या महिनाभरापासून ही स्थिती कायम आहे. तुंबलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीबरोबरच डासांची पैदास वाढली, आहे, नाल्यातील अस्वच्छतेकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

 

दरम्यान, याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे पत्रव्यवहार करत सद्यस्थितीत सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा ठरणारे बांधकाम साहित्य बाजूला हटवण्याची मागणी केली आहे. लवकरच नाल्याची स्वच्छता केली जाणार असल्याचे नगर परिषद स्वच्छता विभाग निरीक्षक विनायक सावंत यांनी सांगितले.