कोमसापच्या सावंतवाडी शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर 

दीपक पटेकर अध्यक्ष तर राजू तावडे यांची सचिव पदी निवड

मावळते अध्यक्ष ॲड. संतोष सावंत जिल्हा प्रतिनिधी 

सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सावंतवाडी शाखेच्या २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठीच्या नवीन कार्यकारिणीची निवड आज, ११ जून रोजी जिमखाना हॉल येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली. या निवडणुकीत कवी दीपक पटेकर यांची अध्यक्षपदी, तर राजू तावडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली. तसेच, ॲड. संतोष सावंत यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत, उपाध्यक्षपदी अभिमन्यू लोंढे, कोषाध्यक्षपदी डॉ. दीपक तुपकर आणि सहसचिवपदी विनायक गांवस यांची निवड जाहीर करण्यात आली. ॲड. नकुल पार्सेकर, भरत गावडे, प्रज्ञा मातोंडकर, मंगल नाईक-जोशी, मेघना राऊळ, प्रतिभा चव्हाण, विठ्ठल कदम यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याप्रसंगी बोलताना कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले आणि त्यांना साहित्य चळवळ अधिक वेगाने पुढे नेण्याचे आवाहन केले. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना अभिप्रेत असलेले कार्य नव्या कार्यकारिणीने करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मावळते अध्यक्ष ॲड. संतोष सावंत आणि त्यांच्या कार्यकारिणीने गेली तीन वर्षे उत्तम काम केले, जिल्हा साहित्य संमेलनासह विविध साहित्यिक उपक्रम राबवले, याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही मसके यांनी मांडला.

सभेच्या सुरुवातीला पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान, ज्येष्ठ साहित्यिक तथा वैज्ञानिक जयंत नारळीकर आणि कोमसाप परिवारातील निधन पावलेल्या सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रतिभा चव्हाण यांनी मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचले. डॉ. दीपक तुपकर यांनी नफा-तोटा अंदाजपत्रक सादर करत वार्षिक जमा-खर्च अहवाल दिला. ॲड. सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात राबवलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर केला. त्यानंतर नवीन कार्यकारिणीच्या बिनविरोध निवडीची प्रक्रिया पार पडली.

यावेळी व्यासपीठावर कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, केंद्रीय सदस्या सौ. उषा परब, मावळते तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, माजी तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिका सौ. उषा परब, प्रा. सुभाष गोवेकर, ॲड. नकुल पार्सेकर, ॲड. प्रा. गणपत शिरोडकर, विनायक गांवस यांनी मनोगत व्यक्त करत नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

नवनियुक्त जिल्हा प्रतिनिधी ॲड. संतोष सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना मावळत्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले आणि नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना पदाला न्याय देईन, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटेकर म्हणाले की, सर्वांनी विश्वास टाकून संधी दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. साहित्यिकांची भूमी असलेल्या कोकणात साहित्यिक चळवळ कशी पुढे जाईल आणि नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ कसे मिळेल, यावर आपला भर असेल. कोमसापचे सुरू असलेले कार्य अधिक वेगाने पुढे नेण्यासह मधुभाईंना अपेक्षित कार्य शाखेच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी डॉ. जी.ए. बुवा, एस.एन. मुकन्नावर, प्रा. गणपत शिरोडकर, अभय नेवगी, दिनानाथ नाईक, ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. रूपेश पाटील, दत्ताराम सडेकर, वाय. पी. नाईक, मृणालिनी कशाळीकर, प्रज्ञा मातोंडकर, मेघना राऊळ, सुहासिनी सडेकर, मंगल नाईक जोशी, डॉ. सोनल लेले, किशोर वालावलकर, संजीव मोहीते, प्रा. डॉ. गणेश मर्गज, एकनाथ कांबळे, रामदास पारकर, संतोष पवार, रितेश राऊळ आदींसह अनेक साहित्यिक आणि सदस्य उपस्थित होते. प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.