खेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा दोन महिलांवर हल्ला

खेड(प्रतिनिधी)

खेड नगरपरिषद हद्दित मोकाट कुत्र्यांचा वावर रोखण्यासाठी नगरप्रशासनाने निर्बिजीकरणाची मोहीम राबवत ५०० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरणही केले होते. मात्र पुन्हा भटक्या कुत्र्यांचा वाढला आहे. भटक्या कुत्र्यांनी दोन महिलांवर हल्ला केल्याची बाब समोर आली आहे. यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरप्रशासनाने पुन्हा निर्बिजीकरणाची मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

यापूर्वी मोकाट कुत्र्यांच्या वावराने नागरिक अक्षरशः मेटाकुटीस आले होते. नगरप्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर २० मार्चपासून नगरपरिषद हद्दीत निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली होती. ५०० मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर मोहीम थांबवण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी येत असल्याने पालक धास्तावले आहेत.

मोकाट कुत्र्यांनी दोन महिलांवर हल्ला केल्याची बाब देखील समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः मंदिराच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा उच्छाद पुन्हा वाढल्याने भाविकही धास्तावले आहेत. नगरप्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेवून पुन्हा निर्बिजीकरणाची मोहीम राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.