चिपळूण (प्रतिनिधी):–सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज आंबडस विद्यालयात सोमवार दि. १६ जून रोजी ढोल ताशांच्या गजरात नवागतांचे स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित पालकांच्या हस्ते इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
विद्यालयात सकाळपासूनच नवागतांच्या स्वागताची लगबग सुरू झाली होती. शाळेच्या आवारात सजावट करण्यात आली. आंबडस बाजारपेठेच्या परिसरातून नवागताना ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत शाळेत आणण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा विद्यालयातील माजी विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या कडून नवागतांवर पुष्पवर्षाव करण्यात आला. तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर पालक, ग्रामस्थ व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत इ. ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. प्रवेशोत्सव कार्यक्रम व मोफत पुस्तक वाटप कार्यक्रमाला धामणंद प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ .गुजर उपस्थित होत्या.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास चोरगे यांनी नवीन शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी उद्बोधन केले.













