मंडणगड : प्रतिनिधी, मंडणगड तालुक्यात गुरुवारी ( 19 जून ) सकाळपासून मुसळधार पावसाने सुरवात केल्याने त्याचा परिणाम दैनदिन जीवनमानावर झाला. पावसामुळे मंडणगड – दापोली राज्यमार्गावरिल केळवत घाटात मोठे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर आंबडवे – राजेवाडी राष्ट्रीय मार्गावरील तुळशी घाटात दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. शहरानजीक भिंगळोली येथील विश्रामगृहा नजिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान, केळवत व माहू तुळशी या प्रमुख मार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी आपत्कालीन विभागाने कार्यवाही करीत झाड, दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.
तालुक्यात दमदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी केले असून भारजा, निवळी नद्या दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाऱ्यावरी भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या असून त्यांचे पंचनामे सुरू आहेत. तालुक्यातील शाळांना शाळा भरवून त्यानंतर लगेचच सुट्टी देण्यात आली आहे. विजेचा मात्र पावसाळ्याला सुरवात खेळखंडोबा सुरू आहे तो अद्याप अविरत आहे, त्यामुळे महावितरणच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक महा वितरणाच्या नियमित सुरू असलेल्या कामकाजा संदर्भात नाराजी व्यक्त करत आहेत. दरड बाजूला करण्यासाठी आपत्कालीन महसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण यांनी परिश्रम घेतले. चौवीस तासात ९५ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत तालुक्यात ५८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.













