मुकुल माधव विद्यालयाचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि उत्कृष्टतेचा पंधरा वर्षांचा प्रवास

रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. यांच्याद्वारे दान केलेल्या १० एकर जागेवर मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकाराने स्थापन झालेले मुकुल माधव विद्यालय यावर्षी आपला १५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. केवळ १५० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज ५०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे.

मुख्याध्यापक रोहित देशपांडे यांनी सांगितले की, “मुकुल माधव विद्यालय हे केवळ ज्ञानाचे केंद्र नसून, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणारे संस्कारपीठ आहे. या यशामध्ये आमचे शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि संस्थेचे मोलाचे योगदान आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिक्षण, कला, पर्यावरण, सामाजिक जबाबदारी आणि आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये शाळेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. शाळेमध्ये सौरऊर्जा प्रकल्प, पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग), वीज प्रतिबंधक यंत्रणा (लाइटनिंग अरेस्टर), आणि स्वतःचा भाजीपाला तुकडा (व्हेजिटेबल पॅच) अशा सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक शिक्षणाची अनुभूती मिळते.

विद्यार्थ्यांना योगा, कराटे, अॅरोबिक्स, बुद्धिबळ आणि जर्मन भाषा यांचे प्रशिक्षण अतिरिक्त शुल्क न आकारता दिले जाते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्ये विकसित होत आहेत.विशेष अभिमानाची बाब म्हणजे, आमच्या विद्यार्थिनी ऐश्वर्या केळकर हिने गोएथे इन्स्टिट्यूट, पुणे यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळवून जर्मनीतील भाषा शिबिरात सहभाग घेतला, ही आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय गौरवाची बाब आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

शाळेचा इयत्ता १० वी व १२ वीचा निकाल सलग १०० टक्के लागत आहे. यापूर्वी विद्यालयाला सिल्व्हर झोन फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्याकडून शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार मिळाला आहे. तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यात जेट टॉय व स्किमर ऑलिंपिक, खुला आसमाँ कला स्पर्धा, रंगबहार स्पर्धा, देश आपनायें उपक्रम यांचा समावेश आहे. या सर्व यशामागे आमच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रेरणादायी मार्गदर्शन आहे. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळेच मुकुल माधव विद्यालयाने यशाची शिखरे गाठली असल्याचे मुख्याध्यापक देशपांडे यांनी नमूद केले.

चौकट
ग्रीन स्कूलमध्ये भारतात नववा क्रमांक
२०२५ मध्ये भारतातील ग्रीन स्कूलमध्ये ९ वा क्रमांक मिळवला असून न्यूयॉर्क येथे होणाऱ्या ग्रीन स्कूल परिषदेत आमंत्रण मिळाले आहे. हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठा सन्मान म्हणावा लागेल. समाजसेवा व मूल्यशिक्षण हेच शाळेचे ब्रीद आहे. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांतून सामाजिक जबाबदारीची जाणीव जोपासली आहे. जसे की समुद्रकिनारा स्वच्छता, निःशुल्क आरोग्य शिबिरे, ग्रंथ दान उपक्रम यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.