सावंतवाडी : नुकत्याच पार पडलेल्या माणगाव पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगाव यांच्या संचालक मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ‘शिक्षण अग्रणी पॅनेल’चे उमेदवार, माजी सैनिक चंद्रशेखर शिवराम जोशी हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयामुळे शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
मागील तीन वर्षांपासून श्री. जोशी यांनी संस्था आणि शालेय विकासात भरीव कामगिरी केली आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी स्वखर्चाने अनेक उपक्रम राबवले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा व उत्तम शैक्षणिक वातावरण मिळाले आहे. सध्या ते सैनिक पतसंस्थेचे विद्यमान संचालक म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
याशिवाय, इंडियन एक्स-सर्व्हिसमन लीग, महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट मेंटर, सिंधुदुर्ग या माजी सैनिकांच्या संस्थेच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली आहे, हे विशेष. त्यांच्या या दुहेरी यशाचे औचित्य साधून सैनिक नागरी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी सैनिक नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री. भार्गव कविटकर, व्हा. चेअरमन श्री. चंद्रकांत शिरसाट, तसेच विद्यमान संचालक श्री. दिनानाथ सावंत, श्री. सुभाष सावंत, श्री. भिवा गावडे, श्री. संतोष सुसळे, श्री. शामसुंदर सावंत, श्री. बाळू बर्गे, श्री. शांताराम पवार, श्री. गोपाळ वाईत, तज्ञ संचालक श्री. तातोबा गर्ग, श्री. पद्मनाभराव, पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील राऊळ आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
चंद्रशेखर जोशी यांच्या विजयामुळे माणगाव पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुढील वाटचालीस नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












