खेड | प्रतिनिधी
खेड शहरातील सार्वजनिक सुविधांची दुरवस्था, तसेच प्रशासनाकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते मंगेश दादा मोरे यांनी येत्या ७ जुलै २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
खेड नगर परिषदेकडून चालविण्यात येणारा प्राथमिक आरोग्य केंद्राचा दवाखाना पूर्ववत सुरु करावा, या मागणीसाठी मोरे यांनी १ मे २०२५ रोजी उपोषण केले होते. त्या वेळी प्रशासनाने लेखी आश्वासन दिले की, वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक लवकरच केली जाईल. मात्र, दोन महिन्यांनंतरही दवाखाना सुरु झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे.
त्याचप्रमाणे, खेड-भरणानाका ते डेंटल कॉलेज या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, याबाबत मोरे यांनी मागील महिन्यात उपोषण करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन घेतले होते. परंतु कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने पहिल्याच पावसात रस्त्यावरील खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत.
याशिवाय, भोस्ते ग्रामपंचायत हद्दीतून खेड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. यासाठी मोरे यांनी २६ जानेवारी २०२५ रोजीही उपोषण केले होते. त्या वेळी देखील तत्काळ दुरुस्तीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने रस्ता पुन्हा खराब झाला आहे.
या रस्त्यांवरून शेकडो वाहनांचा आणि नागरिकांचा दररोज प्रवास होतो. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, महिला आणि शाळकरी मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासनाच्या वेळोवेळी दिल्या गेलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे आणि नागरिकांच्या मुलभूत गरजा दुर्लक्षित केल्या जात असल्यामुळे, मंगेश मोरे यांनी ७ जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी प्रशासनाने या सर्व प्रलंबित प्रश्नांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी आणि नागरिकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.










