चिपळूण उक्ताड रस्त्याचे खड्डे तात्काळ भरा अन्यथा रस्ता रोको -साजिद सरगुरोह

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण-गुहागर महामार्गावरील उक्ताड रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याची चाळण झाली असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. पाऊस सुरू असल्याने खड्ड्यात पाणी भरल्याने रात्रीच्या वेळेस अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तात्काळ दोन दिवसात रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा रस्ता रोको छेडण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी दिला आहे.
चिपळूण-गुहागर मार्गावर एसटी व खाजगी बसेसचा प्रवास मोठ्या प्रमाणात होत असून या मार्गावरून अनेक गावे जोडलेली आहेत. हजारोच्या संख्येने प्रवासी या मार्गावर प्रवास करत असतात. उक्ताड रस्त्याची चाळण झाल्याने वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत असतात. उक्ताड रस्त्यावरून मुंबई, रत्नागिरी, लाईफ केअर हॉस्पिटल, चिपळूण बाजारपेठ गोवळकोट, मिरजोळी, कोंढे या परिसरातील प्रवासी उक्ताड या मार्गावरून ये-जा करत असतात. या रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करण्यात आली होती. हा रस्ता ठेकेदारांच्या फायद्यासाठी करण्यात येत आहे काय? असा प्रश्न श्री. सरगुरोह यांनी केला आहे.
पुढील दोन दिवसात उक्ताड रस्त्याचे खड्डे भरले नाहीत तर नागरिकांना घेऊन रस्ता रोको करण्यात येईल. याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असून पुढील दोन दिवसात तात्काळ मीटिंग घेऊन खड्डे भरण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग अभियंता श्याम खुनेकर यांनी श्री. सरगुरोह यांना दिला आहे.