गोवळकोट रोड रस्त्यावरील खड्डे काँक्रीटने भरण्यात येतील

मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे साजिद सरगुरोह यांना आश्वासन
चर्चेतून विषय मार्गी

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील गोवळकोट रोड रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या रस्त्यावरील खड्डे येत्या आठ दिवसात काँक्रीटने भरण्यात यावेत, अशी मागणी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी केली आहे. यासंदर्भात श्री. सरगुरोह यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याशी चर्चाकेल्यानंतर पाऊस कमी झाला की त्वरित खड्डे भरू, असे आश्वासन दिले.
कोकणात गेल्या काही महिन्यांपासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने चिपळूण शहर आणि गोवळकोटरोड येथे रस्त्याला खड्डे पडले आहेत. तक्रार केल्यानंतर या रस्त्यावर खड्डे मकिंग केली जातात. मात्र, पाऊस पडल्यानंतर मकिंग वाहून जाते आणि पुन्हा रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण होत आहे. याबाबत श्री. सरगुरोह यांनी चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याशी चर्चा करून हे खड्डे त्वरित काँक्रीटने भरावेत, हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. यावर श्री. भोसले यांनी पुढील आठ दिवसात खड्डे काँक्रीटने भरण्यात येतील, असे आश्वासन दिले.