फणस बियांपासून तयार झाले आरोग्यदायी पेय
बांदा : प्रतिनिधी
दुय्यम मानल्या जाणाऱ्या फणस बियांना नवजीवन देत त्यातून आरोग्यदायी पेय निर्माण करण्याची किमया मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साधली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील विद्यार्थ्यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. ‘जॅक कॉफी’ या आरोग्यवर्धक पेयाचं यशस्वी प्रात्यक्षिक वाफोली गावात श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन विलास गावस व वाफोली सोसायटी चेअरमन सौ. धनश्री गवस यांच्या गृह लघुउद्योगाच्या ठिकाणी करण्यात आले.
या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांनी फणसाच्या बियांपासून कॉफी तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया सविस्तर समजावून सांगितली. या ‘जॅक कॉफी’चे अनेक फायदे उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आले. डायबेटिससाठी उपयुक्त, पचन सुधारक, शरीराला उर्जा देणारी आणि पूर्णतः नैसर्गिक. यासोबतच ही कल्पना शून्य कचरा संकल्पनेशी सुसंगत असून पर्यावरणपूरक असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे फणस बियांना आर्थिक मूल्य प्राप्त होत असून त्या विकून शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ शकते. गावपातळीवर या प्रकारचे प्रयोग पुढे राबवले गेले तर स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते.
या नाविन्यपूर्ण उपक्रमात आर्य मोरजकर, प्रज्वल उगवेकर, संतोष घेरडे, वैष्णव जगदाळे, राज नाईक, अथर्व देवळेकर आणि यश वाघ या विद्यार्थ्यांचा समावेश होता.या विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर सामाजिक भान, सर्जनशीलता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाचाही मार्ग दाखवला आहे, असे चेअरमन विलास गवस यांनी सांगितले.









