मंडणगड l प्रतिनिधी – मंडणगड नगरपंचायतीचेवतीने कार्यक्षेत्रातील दिव्यांग व जेष्ठ नागरीकांसाठी नगरपंचायत व्यापारी संकुलाचे तळ मजल्यातील गाळ्यात दिव्यांग व जेष्ठ नागरीक सुविधा केंद्रांचे 16 जुलै 2025 रोजी शहरातील दिव्यांग नागरीक, नगरसेवक, नगरपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत फित कापून उद्घाटन करण्यात आले. 
उद्घाटन समारंभास नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, विरोधीपक्ष गटनेता विनोद जाधव, नगरसेवक योगेश जाधव, आदेश मर्चंडे, मुकेश तलार, नगरसेविका वैशाली रेगे, सेजल गोवळे, हरेश मर्चंडे, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, प्रशासकीय अधिकारी महेश दळवी, लेखापाल सागर कारंडे, नगरपंचायत कर्मचारी मनोज मर्चंडे, विकास साळवी,नितेश लेंढे, संदीप डीके, रोशन बेलोसे, समिर साळवी, राणी सापटे, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ पोस्टुरे, बाळाराम पोस्टुरे, श्री.परब,आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचीत्य साधून नगरपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांग नागरीकांना पाच टक्के निधीतून देण्यात आलेल्या दिव्यांग सहाय्यता निधीचे धनादेशांचे वाटपही करण्यात आले. या उपक्रमामुळे संबंधीत नागरीकांना नगरपंचायतीशी संबंधीत कामासाठी इमारतीचे दोन मजले वारवांर चढण्याची आवश्यकता राहीलेली नाही. या केंद्रांच्या माध्यमातून दिव्यांग व जेष्ठ नागरीकांची नगरपंचायतीशी संबंधीत सर्व कामे पुर्ण केली जाणार आहेत. या केंद्रांत नगरपंचायत नागरीकांना देत असलेल्या सर्व सेवा व दाखले उपलब्ध करुन देणार आहे. याकरिता नगरपंचायतीचा एक कर्मचारी कामांचे सर्व दिवस सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत केंद्रांत हजर राहणार असल्याची माहीती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी केंद्रांचे उद्घाटन समारंभाचे निमीत्ताने पत्रकारांना दिली आहे. नगरपंचायतीने कार्यालयाच्या तळमजल्यावर दिव्यांग व जेष्ठ नागरीक सुविधा केंद्र सुरु केल्याने नागरिकांच्या वतीने प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून शहरवासीयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.











